

डोंबिवली शहर : थंडीची चाहूल लागताच बाजारपेठेत हंगामी भाज्यांची लगबग वाढत आहे. त्यात राजस्थानातील प्रसिद्ध हळदीची भाजी आता सर्वत्र आवडीने घेतली जाऊ लागली आहे. शहरी भागातही ओली हळद, भाजीला चांगली मागणी वाढली आहे.
शरीराला उष्णता देणारी आणि आरोग्यदायी गुणधर्मांनी भरलेली ही भाजी राजस्थानात हिवाळ्यात तसेच लग्नसमारंभांसारख्या प्रसंगी पारंपारिकरीत्या केली जाते. महाराष्ट्रातही या भाजीकडे अलीकडेच मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले जात असून घराघरात तिचा समावेश वाढतो आहे.
सध्या ही भाजी सुमारे 200 रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या आशा घोलाप यांनी सांगितले की, “सध्या डोंबिवलीत ही भाजी 200 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रीय किंवा इतर ठिकाणचे सर्वच भागातील लोक ही भाजी घेण्यासाठी गर्दी करत आहेत.“ गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात आलेल्या या भाजीची किंमत येणाऱ्या काळात आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
हळदीच्या कंदात दाह कमी करणारे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असल्याने हिवाळ्यात तिच्या सेवनाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे चव आणि आरोग्य यांचा समतोल साधणारी ही भाजी डोंबिवलीत लोकप्रिय होत असून, बाजारातील वाढती गर्दी पाहता यंदा ‘हळदीची भाजी’ हिवाळ्याची खास चव ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
आरोग्यासाठी गुणकारी
हळदीचे औषधी गुणधर्म सर्वश्रुत आहेत. हळदीमध्ये असलेले करक्युमिन हे घटक आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळेच, थंडीमध्ये या भाजीचे सेवन केल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात आणि यामुळेच डोंबिवलीकर नागरिक देखील या भाजीला आपल्या आहारात समाविष्ट करत आहेत.