

नाते : मागील अनेक वर्षांपासून शिवभक्तांची मागणी असलेल्या महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्यातील बारा किल्ल्यांचा समावेश युनोस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शेकडो शिवभक्त व स्थानिक प्रशासनाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी ओमासे यांनी राज्यातील 11 व तामिळनाडू राज्यातील जिंजी किल्ल्याचा समावेश युनोस्को च्या जागतिक वारसा यादीमध्ये केल्याबद्दल सर्व शिवभक्तांना हा आनंदाचा व अभिमानास्पद दिवस असल्याचे मत व्यक्त केले. डीवायएसपी शंकर काळे यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड चा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये केल्याने आता पोलीस दलाची जबाबदारी वाढली असल्याचे मत व्यक्त केले.
युनोस्कोने काल जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग व तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. महाडचे माजी उपनगराध्यक्ष कोकण कडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पावले हजारो शिवभक्तांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाल्याबद्दल सर्वांनाच आजचा दिवस आनंददायी असल्याचे मत व्यक्त करून या संदर्भात त्यांनी शासनाने यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोंझर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझीम पथकासह या कार्यक्रमाला शोभा आणली पोलीस दलाच्या वतीनेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंदात सहभाग घेतला. याप्रसंगी महाड एसटी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी गजानन मोरे यांनी राज दरबारात काढलेला रांगोळीला उपस्थित शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.