हडपसर टर्मिनल नव्या रंग-रुपात..! विकसनाचे काम 60 टक्के पूर्ण

हडपसर टर्मिनल नव्या रंग-रुपात..! विकसनाचे काम 60 टक्के पूर्ण
पुणे :  रेल्वेच्या हडपसर टर्मिनलच्या विकासाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आत्तापर्यंत 60 टक्क्यांपर्यंत कामे झाली आहेत. आगामी काळात अवघ्या काही महिन्यांतच रेल्वे प्रवाशांना येथील नव्या विकसित झालेल्या टर्मिनलच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
दै. 'पुढारी'कडून बुधवारी येथील कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी येथे नव्याने उभारण्यात येणार्‍या मुख्य इमारतीचे काम अंतिम टप्प्याकडे जात असल्याचे दिसले. त्यासोबतच येथे प्रवाशांना प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी आवश्यक असलेला फूट ओव्हर ब—ीज उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच, इतर पायाभूत सुविधांसाठीही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्य इमारतीसह वेटिंग रूम, व्हीआयपी लाउंज, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, सुसज्ज आरपीएफ ऑफिस, पार्सल ऑफिस उभारणीची कामेही पूर्णत्वाकडे जात आहेत. त्यामुळे आगामी काळात म्हणजेच जुलैअखेरपर्यंत येथील कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना काढली

हडपसर टर्मिनल येथे प्रशासनाकडून नवीन  रेल्वे मार्गिका उभारण्यात येणार आहे. त्यासाठी येथे अतिरिक्त जागेची रेल्वेला आवश्यकता आहे. यासंदर्भातील मागणी रेल्वेने राज्य प्राधिकरणाकडे केली आहे. त्याची कार्यवाही सुरू असून, 20 ए अंतर्गत अधिसूचनाही काढण्यात आली आहे.

फीडरची व्यवस्था वाढवा

छोटा रस्ता असल्यामुळे सध्या हडपसर टर्मिनल येथून फक्त दोन मिनी बसद्वारे प्रवाशांना फीडर सेवा पुरविली जात आहे. मात्र, ती अपुरी आहे. यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव येथील रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. रिक्षाचालक प्रवाशांची अव्वाच्या सव्वा पैसे आकारून लूट करत आहेत. ते थांबवण्यासाठी पीएमपी प्रशासनाने येथे दोनपेक्षा अधिक मिनी बसची प्रवाशांकरिता फीडर सेवा पुरवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हडपसर टर्मिनल विकासाचे काम 60 टक्क्यांपर्यंत झाले आहे. मुख्य इमारतीसह वेटिंग रूम, स्वच्छतागृह, व्हीआयपी लाउंज, एफओबीची कामे प्रगतिपथावर आहेत. येथे नवीन मार्गिका टाकण्यासाठी आम्ही राज्याकडे मागणी केली आहे. त्याचेही लवकरच काम सुरू होईल. तसेच, येथे प्रवाशांकरिता आरपीएफचे जुने ठाणे पाडून त्या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जाईल. यासोबतच महापालिकेला येथील अरुंद रस्ता रुंद करण्यासाठी पत्र दिले आहे. फीडर बस वाढवण्याचीही पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.
– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

 टर्मिनलवर या सुविधा मिळतील

  • हडपसर रेल्वे स्थानकाचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास करणे, यात नवीन अतिरिक्त लूप लाइन्सची तरतूद आहे. नवीन स्टेशन इमारत 21 मीटर आणि 14 मीटर रुंद राहील.
  • दोन नवीन प्रवेशद्वारांची तरतूद आहे. नवीन मुख्य प्रवेशद्वार आकर्षक थीमवर आधारित आहे.
  • नवीन बुकिंग ऑफिस, एटीव्हीएम मशिन.
  • फर्स्ट आणि सेकंड क्लास वेटिंग रूम, व्हीआयपी लाउंज.
  • फूड प्लाझा आणि कॅफेटेरिया, क्लॉक रूम, रिटायरिंग रूम.
  • कुली रूम, पार्सल ऑफिस, चाइल्ड केअर रूम.
  • नवीन सुधारित टॉयलेट ब्लॉक्स आणि वॉटर बूथ.
  • जमिनीखालील आणि ओव्हरहेड पाण्याच्या टाकीची तरतूद.
  • संपूर्ण कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मची तरतूद.
  • नवीन फर्निचरच्या तरतुदीसह प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूममध्ये आसन क्षमता वाढवणे.
  • रूफ प्लाझा आणि 2 एस्केलेटरसह 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजची तरतूद
  • बहुमजली पार्किंगच्या तरतुदीसह संरक्षित पार्किंगचा विकास
  • रस्तारुंदीकरण, लँडस्केपिंग, पादचारी मार्गांसह परिभ्रमण क्षेत्राचा विकास.
  • दिव्यांगजन फ्रेंडली टॉयलेट आणि वॉटर बूथ.
  • बुकिंग काउंटर तसेच रॅम्प आणि स्वतंत्र पार्किंग.
  • नवीन 12 मीटर रुंद एफओबी (फूट ओव्हर ब्रिज) रॅम्प.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news