प्रचाराच्या रणधुमाळीत कलाकारांचीही ‘एंट्री’; रील्स, व्हिडीओसाठीही मिळतेय संधी | पुढारी

प्रचाराच्या रणधुमाळीत कलाकारांचीही ‘एंट्री’; रील्स, व्हिडीओसाठीही मिळतेय संधी

सुवर्णा चव्हाण

पुणे : व्हॉट्सअ‍ॅपवर उमेदवारांच्या प्रचारासाठीची ऑडीओ क्लिप ऐकलीच असेल… रिक्षा अन् विविध गाड्यांमधून प्रचार गीतांचा आवाजही ऐकू येत असणारच… सध्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत कलाकारांचीही एंट्री झाली असून, या धुराळ्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी कलाकारांना प्रचार गीत तयार करण्यापासून ते ऑडीओ क्लिप्स तयार करण्यापर्यंतचे काम मिळाली आहेत. अगदी सोशल मीडियावरील प्रचाराच्या रील्स, व्हिडीओतही कलाकार अभिनय करत आहेत.
लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून, राजकीय पक्षातील उमेदवार आता उमेदवारी अर्ज भरत आहेत. प्रचार मोहिमांना सुरुवात झाली असून, लोककलावंत, नाट्यकर्मी, निवेदक, गायक, वादक… असे फक्त पुण्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील कलाकार प्रचारासाठीच्या कामात व्यग्र आहेत.  गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांमधील उमेदवारांसाठी प्रचार गीत तयार करणारे कलाकार प्रदीप कांबळे म्हणाले, निवडणुकांच्या प्रचारामध्ये आजही प्रचार गीतांचा मोठा वाटा आहेच. ही गीते मतदारांपर्यंत थेट पोहोचतात, गाजतात. त्यामुळे उमेदवारांकडून अशी प्रचार गीते तयार करून घेतली जातात. आम्ही लोकसभा निवडणुकांसाठी एका राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी दोन प्रचार गीते तयार करत आहोत. गीताच्या लेखनापासून ते संगीतापर्यंतचे काम आम्ही केले असून, सुमारे आठ ते दहा जणांची टीम प्रचार गीते तयार करीत आहे. गीतांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. लवकरच दोन्ही गीते प्रचार मोहिमांमध्ये ऐकायला मिळतील.
एका राजकीय पक्षाच्या महिला उमेदवारासाठी आम्ही पथनाट्य तयार केले असून, जवळपास 60 कलाकार ठिकठिकाणी जाऊन पथनाट्य सादर करणार आहेत. सध्या पथनाट्याची रंगीत तालीम सुरू असून, अनेक नामवंत कलाकारांचाही त्यात सहभाग आहे. निवेदकही प्रचार मोहिमांच्या कार्यक्रमांच्या निवेदनासाठी काम करत आहेत. प्रचार मोहिमांमध्ये लोककलावंतांचाही सहभाग आहे.
– योगेश सुपेकर, निवेदक-कलाकार
आता प्रचाराचे स्वरूप डिजिटल माध्यमाकडे वळले आहे. पारंपरिक प्रचार मोहिमांसह सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. त्यामुळे यंदा काही राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या ऑडीओ क्लिप्ससाठी मी आवाज दिला. हे ऑडीओ क्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले जाणार असून, प्रचारासाठी वापरले जाणार्‍या रिक्षा आणि व्हॅनवरही ऐकायला मिळणार आहेत. निवडणुका आल्या, की कलाकारांना प्रचारासाठीचे काम मिळते. त्यामुळे कलाकारांना चांगले अर्थार्जनही होते.
– राहुल भालेराव, कलाकार

इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या लागल्या कामाला

पुण्यासह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, वर्धा, कोकण भाग… अशा विविध ठिकाणचे कलाकार उमेदवारांच्या प्रचारासाठीचे काम करत आहेत. प्रचार गीतांसाठी गायक-वादकांची टीम कामाला लागली असून, सोशल मीडियावरील रील्स, व्हिडीओसाठीचे शूट कलाकारांच्या टीमकडून वेगवेगळ्या लोकेशनवर केले जात आहे. हे रील्स आणि व्हिडीओ विविध थीमवर तयार केले जात आहेत. कोणी विकासकामांसह विविध थीमवर असे रील्स आणि व्हिडीओ तयार होत आहेत. राजकीय कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्याही कामाला लागल्या असून, त्यातही कलाकारांचा सहभाग आहे.

हेही वाचा

Back to top button