पुणे, पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये सुरू असलेल्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार आहे. त्यानुसार प्रवेशासाठी इच्छुक असणार्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.ऑनलाइन प्रवेश परीक्षा साधारण 21 ते 23 जुलै या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, राज्यातील अनेक विद्यापीठांमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यापार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया येत्या 15 जूनपासून सुरू होणार आहे. याबाबतचे सविस्तर माहितीपत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे.
या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 जून ते 17 जुलै या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध होणार आहे. पुणे विद्यापीठाची अंतिम वर्षाची सत्र परीक्षा लक्षात घेता ही परीक्षा 21 ते 23 जुलै या कालावधीत होण्याची शक्यता अधिकार्यांनी वर्तविली आहे.
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये 13 पदवी अभ्यासक्रम सुरू असून, त्यासाठीची परीक्षा केवळ एकच दिवस राहणार आहे. तर, इतर दिवशी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा विविध सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाकडून परीक्षा झाल्यानंतर, तातडीने निकाल जाहीर करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वेळेत प्रवेश होऊन, शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यंदाही विद्यापीठाने प्रवेशप्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यापीठात पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी साधारण अडीच हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांचे शुल्क इतर खासगी विद्यापीठे आणि कॉलेजांच्या तुलनेत कमी आहे.
हेही वाचा