तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा: शेतकरी बांधवांनी फायदेशीर शेती व्यवसाय करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी मावळ तालुक्याच्या कृषी पहाणी दौर्यामध्ये केले.
सचिव डवले यांनी नुकताच मावळ तालुक्यातील शिळीम, येलघोल आणि भडवली या गावातील शेती पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर गोटे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोराडे, नागनाथ शिंदे,दत्तात्रेय गावडे, विकास गोसावी,कृषी मित्र लहू धनवे, अंकुश मोहळ, संभाजी कडू, शंकर धनवे आदी उपस्थित होते.
शेतकर्यांनी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर प्राधान्याने करून अधिक उत्पादन घ्यावे.
असे सांगून डवले म्हणाले की, मावळ तालुक्यात शेतकरी वर्गामध्ये मावळ कृषी विभाग उत्तम जागृती करीत असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. डवले यांनी येथील शेतकर्यांच्या विविध उपक्रमास भेटी दिल्या.
यावेळी मौजे शिलिंब येथे डवले यांनी संतोष कडू यांची राइसमिल , लहू धनवे यांच्या ऊस हुमणी कीड नाशक प्रकल्प, प्रकाश सापळे प्रत्यक्षिक देऊन , संभाजी कडू यांच्या यांत्रिकीकरण योजनेतील रोटावेटर ,दत्तू धनवे यांच्या एसआरटी भात लागवड, फळबाग लागवड , अनिल ढमाले यांच्या कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टरची पाहणी केली.
येलघोल येथे आनंद घारे, नरहरी वाजे, पंढरीनाथ घारे, विक्रम घारेयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत भातपिक प्रकल्प 22-23 यांत्रिकीकरण पद्धतीने रोपवाटिका पाहणी केली, भडवली येथे मुकुंद ठाकर यांच्या साई रोजेस हरितग्रह ची पाहणी केली. शिलिंब चे कृषिसहाय्यक विकास गोसावी, शिवली गावचे कृषि सहाय्यक दत्तात्रय गावडे या क्षेत्रीय कर्मचार्याच्या उत्कृष्ट कामाबाबत कौतुक डवले यांनी केले.