

बारामती : पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (दि. 27) बारामती तालुक्यात आगमन होत आहे. बारामती- दौंडच्या सीमेवर गुंजखिळा येथे तालुक्याच्या वतीने सोहळ्याचे स्वागत केले जाईल. त्यानंतर सायंकाळी उशिरा सोहळा उंडवडी येथील पालखी तळावर विसावेल. दरम्यान मंगळवारी (दि. 28) पालखी बारामतीत मुक्कामी असेल. येथील शारदा प्रांगणात सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला असून पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारामती शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. पालखी मुक्कामी असलेल्या शारदा प्रांगणात मुरुमीकरण करून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
दर्शनबारीसाठी लोखंडी बॅरीकेड्स उभारण्यात आले आहे. यातूनच दर्शन घेता येणार आहे. प्रशासनाच्या वतीने विजेची व्यवस्था, सभामंडप, जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, स्नानगृहे आदींची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने शहरातील वाहतुकीत बदल केला असून पालखी काळात प्रवाशांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत बाह्य मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभागही सतर्क झाला असून वारकर्यांच्या सेवेसाठी मोफत सेवा देण्यात येणार आहे.
याशिवाय वारीत मास्क वापरण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी माहितीफलक लावण्यात आले असून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. पालिका, महसूल, पोलिस, आरोग्य विभाग यांच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून मंगळवारी पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था व पालिका प्रशासनाच्या वतीने वारकरी व दिंडी मुक्कामी असलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. पाटस रस्त्यावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे स्वागत होणार आहे.
हेही वाचा