नगर : सरकारी बाबू असुरक्षित..! सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ | पुढारी

नगर : सरकारी बाबू असुरक्षित..! सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ

श्रीकांत राऊत

नगर : सामान्य नागरिकांना सेवा देणे, त्याची सुरक्षा करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंतच्या चार महिन्यात 52 सरकारी कर्मचार्‍यांवर नागरिकांनी हात उचलला. धक्कादायक बाब म्हणजे त्यात सर्वाधिक 21 पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जिथे पोलिस सुरक्षित नाहीत, तिथे सामान्य माणसाचे काय? असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

सामान्य नागरिकांची सुरक्षा करताना पोलिसांना कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही, म्हणतात तेच खरे आहे. अवैध धंद्यांसह आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिस पथकांवर हल्ला झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात अनेक वेळा तो हल्ला पोलिसांच्या जिवावर बेततो. दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरात एका प्राध्यापकाने पत्नीसह पोलिस कर्मचार्‍यांना जायबंदी केले. चार वर्षांपूर्वी शिरूर(जि. पुणे) येथे आरोपी शोधासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकावर जमावाने हल्ला केला होता. अनेक वेळा पोलिसांची आरोपींशी झटापट होते. त्यात पोलिस जखमी होतात. अशा 21 पोलिसांवर हल्ला झाल्याची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे.

यांच्यावर झाले हल्ले
पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वायरमन, व्हॉल्व्हमन, एसटी बस चालक, वाहक, पोस्टमन

असे आहे सुरक्षा कवच
शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे, यासाठी त्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. भारतीय दंडसंहिता कलम 353 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्‍याला मारहाण करणे, हा कायद्याने गुन्हा ठरतो. त्यासाठी दोन वर्षे शिक्षेसह दंडाची तरतूद केलेली आहे.

पोलिस दप्तरी दाखल 51 गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, अद्यापही काही गुन्ह्यांचा शोध लागलेला नाही. एकूणच सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक पोलिस कर्मचार्‍यांची संख्या आहेत, ही चिंतेची बाब आहे.

महसूल विभागाचे कर्मचारी वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी गेले असता, त्यांच्यावरही अनेक वेळा हल्ला झाला आहे. तहसीलदार, मंडलाधिकारी यांच्यावर हल्ला झाल्याचे गुन्हे पोलिस दप्तरी दाखल आहेत. पोलिसांसह शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ला व शिवीगाळ हे प्रकार जिल्ह्याला काही नवे नाहीत.

विभागनिहाय हल्ले
पोलिस 20, महसूल व वन 8, ऊर्जा व कामगार 4, नगर विकास 4, आरोग्य 2, एसटी महामंडळ 8, जिल्हा परिषद 7, पाटबंधारे 1

चार महिन्यात 52 कर्मचार्‍यांवर हल्ले

आकडे बोलतात
(कर्मचार्‍यांवरील हल्ले)
मार्च 14
फेब्रुवारी 9
जानेवारी 13
एप्रिल 21

 

Back to top button