पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने गेल्या दहा महिन्यांमध्ये टंकलेखन संस्थांना विविध सवलती देण्याबरोबरच गैरप्रकारांना देखील चाप लावला आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवत संस्थांना शिस्त लावली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. डॉ. बेडसे म्हणाले, मशिन टायपिंग, संगणक टायपिंग व लघुलेखनाचे फॉर्म भरण्याकरिता सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. जर विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त विषयांसाठी फॉर्म भरायचा असेल, तर आता एकच फॉर्म भरावा लागेल व त्यामध्ये विविध विषयांचा समावेश करता येईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या संगणक टंकलेखन परीक्षेचे, मशिन टायपिंग व लघुलेखानामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र 3 ते 4 दिवसाच्या आत उपलब्ध करून दिले. डिसेंबर 2023 च्या मशीन व संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये संभाव्य गैरप्रकार लक्षात घेऊन या परीक्षेला परीक्षा परिषदेच्या कर्मचार्यांना वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पाठवून गैरप्रकाराना आळा घालण्यात आला. या परीक्षेमध्ये पहिल्यांदाच परीक्षार्थीच्या प्रवेश पत्रावर स्कॅन केलेल्या फोटो व्यतिरिक्त उजव्या बाजूला सदर परीक्षार्थीचा अलीकडील कलर फोटो संबंधित संस्था चालकांच्या सही-शिक्क्यानिशी लावण्यात आला.
त्यामुळे परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांना विद्यार्थी ओळखण्याकरिता सुलभ झाले. संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पहिले पाच क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे संस्थाचालकांच्या लॉगिन मध्ये टाकण्यात आलेली आहेत. चांगले, प्रामाणिक काम करणार्या संस्थाचालकांमध्ये उत्साह निर्माण करणे, तसेच बोगस, नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना पास करून घेणार्या संस्थाचालकांना चेतावणी देणे हा या पाठीमागील उद्देश आहे.
हेही वाचा