Jalgaon Lok Sabha Election | संतोष चौधरींचे बंड शमवण्यासाठी जयंत पाटील जळगावात दाखल, नेत्यांशी बंददाराआड चर्चा | पुढारी

Jalgaon Lok Sabha Election | संतोष चौधरींचे बंड शमवण्यासाठी जयंत पाटील जळगावात दाखल, नेत्यांशी बंददाराआड चर्चा

जळगाव- महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आज सकाळी जळगाव मध्ये दाखल झाले. रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंड शमवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची अंतर्गत कलहाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेली. सुरुवातीला एकनाथ खडसे यांनी तब्येतीचे कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपात प्रवेश करणार असल्याचीच घोषणा केली. तर, त्यांची कन्या रोहिनी खडसे यांनी आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याने तुतारीसाठी नव्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. यात जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी यांची नावे समोर आली होती. मात्र अचानक रावेर लोकसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांनी बंडाचे निशाण फडकवले. त्यानंतर 200 च्या जवळपास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले व त्यासाठी त्यांनी नामनिर्देशन पत्रही विकत घेतले आहे.

यामुळे पक्षातील हे बंड शमवण्यासाठी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव मध्ये दाखल झाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बंददाराआड त्यांची चर्चा सुरु आहे. याठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्य रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, रावेरातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील, महानगराध्यक्षा मंगला पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, एजाज मलीक, रमेश पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला आदींसह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

हेही वाचा –

Back to top button