पुणे : पुढारी वृत्तसेवा: पतीचे अपहरण झाल्याचे पत्नीने पोलिस ठाण्यात सांगितल्यानंतर त्या पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, संबंधित व्यक्ती सराईत गुन्हेगार असून, तिला तपासासाठी तेलंगण पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.
तेलंगणमध्ये अमली पदार्थतस्करीचा गुन्हा करून पुण्यात वास्तव्यास असलेल्या गुन्हेगाराला तेलंगण पोलिसांनी ताब्यात घेतले.
मात्र, संशयित आरोपीच्या पत्नीला केवळ तोंडी माहिती देऊन त्याला गाडीत घालून नेले. पत्नीला वाटले पतीचे अपहरण झाले आहे. त्यामुळे तिने खरी माहिती लपवून पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. परंतु, तपासानंतर ते अपहरण नसून तेलंगण पोलिसांनी त्याला गुन्ह्यात ताब्यात घेतल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.
एखाद्या बाहेरच्या राज्यात जेव्हा पोलिस तपासासाठी जातात तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांना याची माहिती देतात. त्यांना सोबत घेऊन आरोपीच्या घरी जातात. आरोपीला अटक केली, तर त्याची संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करणे गरजेचे असते. मात्र, तेलंगण पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांना कोणतीही कल्पना न देता किंवा नोंद न करता त्याला आपल्या सोबत घेऊन गेल्याने हा गोंधळ उडाला. दुसरीकडे, पत्नीसमोर पतीचे अपहरण झाल्याने लोणीकंद पोलिसांना हा प्रकार गंभीर वाटल्याने त्यांनी तत्काळ तपासाची चक्रे गतिमान करीत गाडीचा शोध घेतला.