खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय…धर्मवीर संभाजी महाराज की जय… च्या घोषणांनी पुन्हा एकदा किल्ले सिंहगड दुमदुमून गेला. भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकाचा हा उत्सव यंदादेखील सिंहगडावर उत्साहात साजरा झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे स्वागत पुणे दरवाजा येथे शिवप्रेमींनी पुष्पवृष्टीने केले.
तर, शंखांचा निनाद आणि हलगी वादनाने संपूर्ण सिंहगडाच्या परिसरातील वातावरण शिवमय झाल्याचा भास होत होता. विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून दुचाकी रॅलीत तब्बल 2 हजार शिवभक्त भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री व सहसत्संग प्रमुख दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री संजय मुरदाळे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शरद जगताप, आमदार भीमराव तापकीर,
माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, हरिदास चरवड, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी, किशोर पोकळे, सुमीत बेनकर, दिव्यांग आघाडीचे बाजीराव पारगे आदी उपस्थित होते. या वेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक झाला. तसेच, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे, तसेच सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजनदेखील या वेळी झाले.
हेही वाचा