

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा
पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 चे रुंदीकरण होताना महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीतील भाविकांच्या वर्दळीकडे दुर्लक्ष करून बाह्यवळण रद्द करून जेजुरी शहरातून महामार्गावर रस्त्याच्या केवळ उत्तर बाजूकडील भूसंपादन केले जात आहे. यापूर्वीही दोन वेळा उत्तरेकडील बाजूचेच रुंदीकरण जाणूनबुजून केले आहे.
त्यामुळे अनेक रहिवाशांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊन कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. यातील अनेक कुटुंबांनी हताश होऊन राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी निवेदनाद्वारे मागितली आहे. या महामार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. यात अस्तित्वात असणार्या रस्त्याच्या मध्यातून समसमान अंतरावर खुणा न करता केवळ रस्त्याच्या उत्तरेकडील भूसंपादन केले जात आहे.
2000 आणि 2015 साली रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करून केवळ उत्तरेकडील दुकाने व घरे पाडण्यात आली होती.
या संदर्भात संबंधित प्रशासकीय कार्यालयात हरकती नोंदवून ही बाब शासनच्या निदर्शनास आणून देऊनही अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देऊन एकतर्फी भूसंपादनाची प्रक्रिया राबवीत आहेत.
शेकडो कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन यामुळे नष्ट होऊन कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, अशी माहिती अन्यायग्रस्त नागरिकांनी दिली.
कायद्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूचे भूसंपादन न करता केवळ एकाच बाजूची जागा अधिग्रहण करणे म्हणजे रस्त्याच्या उत्तरेकडील नागरिकांवर अन्याय आहे.
जेजुरी हे यात्रेचे ठिकाण असताना जेजुरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जात आहे, तर जेजुरीशेजारील सासवड व निरा येथून बाह्यवळण विकसित केला जात आहे हा जेजुरीकारांवर अन्याय आहे. केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी बाह्यवळण रद्द करण्यात आला आहे.
उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट होत असल्याने जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असून आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी आयुब महंमद पानसरे, रामभाऊ शंकर काकडे, विमल म्हाळसाकांत खोमणे, गणेश गोविंद खोमणे आदींनी निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केली