पुणे : पुढारी वृत्तसेवा
'मराठी भाषा टिकविण्यासाठी शुद्धलेखन व व्याकरण कटाक्षाने तपासले पाहिजे. आभासी माध्यमामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. लेखकांनी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये,' असे आवाहन लेखक व कवी सिराज शिकलगार यांनी केले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे,
रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाच्या वतीने आयोजित बंधुता दिन व बंधुता काव्य महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिकलगार बोलत होते.
प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. मंदाकिनी रोकडे, बंधुता काव्य महोत्सवाचे अध्यक्ष कवी शंकर आथरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, लेखिका डॉ. माधवी खरात, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, रजनी पाचंगे, संयोजक सदाशिव कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन रंगले. 'बंधुता प्रकाशपर्व साहित्य' पुरस्कार सिल्लोड येथील कवी नारायण खेडकर यांना, 'बंधुता प्रकाशयात्री साहित्य' पुरस्कार पलूस येथील कवी नामदेव जाधव यांना, तर 'बंधुता प्रकाशगाथा साहित्य' पुरस्कार पाथर्डी येथील दिनेश मोडोकर यांना प्रदान करण्यात आले.
सिराज शिकलगार म्हणाले, 'बंधुतेची चळवळ विस्तारण्याची गरज आहे. बंधुतेचे तत्त्व आणि मराठीचा संस्कार रुजण्यासाठी असे महोत्सव उपयुक्त आहेत.' शंकर आथरे म्हणाले, 'कसदार, आशयघन काव्यासाठी कवीला निसर्ग आणि माणसांकडे सूक्ष्मपणे पाहावे लागते. संवेदना प्रत्येकाला असतात; पण त्याचे कवितेत रूपांतर करण्यासाठी कवी मातृहृदयी असावा लागतो. कविता आपले अंतरंग, दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असते.'