बारामती शहर पोलिसांनी मनोरुग्ण महिलेला केले येरवड्याला दाखल

बारामती शहर पोलिसांनी मनोरुग्ण महिलेला केले येरवड्याला दाखल
Published on
Updated on

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरात गेली काही महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या घराभोवती फिरणार्‍या मनोरुग्ण महिलेला शहर पोलिसांनी आधार देत तिला मदत केली. परंतु, तिच्यात कोणताही बदल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर तिला येरवडा येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंगल्याभोवती ही महिला असंबंध बडबड करीत होती. बंगल्याच्या सुरक्षारक्षकांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्यासाठी मी कोल्हापुरातून आली असल्याचे ती सांगत होती. पोलिसांनी तिची चौकशी केली, परंतु ती पत्ता सांगत नव्हती.

अखेर तिला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. माणुसकीच्या नात्याने तिला आश्रयासाठी येथील प्रेरणा शासकीय महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले. तेथील अधीक्षिका संत यांनीही तिला मदत केली. परंतु, महिनाभर दाखल करून घेतल्यानंतरही तिच्या वर्तवणुकीत फरक पडला नाही. अखेर शहर पोलिसांनी तिला ससून रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात नेले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिच्यावर मानसोपचाराची गरज व्यक्त केली. तो अहवाल पोलिसांनी घेत बारामती न्यायालयात दाखल केले.

न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर तिला येरवडा येथील मानसोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी या कामी महिलेला मोलाची मदत केली. असंबंध बडबड ऐकून घेतल्यानंतरही तिला मदत करणे न थांबवता तिच्यावर उपचार कसे होतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, हवालदार निगडे, मोरे, कांबळे यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news