

बारामती : पुढारी वृत्तसेवा
बारामती शहर आणि तालुक्याला 5 जून रोजी सायंकाळी वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. वादळी वार्याने ठिकठिकाणी झाडे पडल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रचंड उन्हाने हैराण झालेल्या बारामतीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र, या पावसाने तालुक्याची दैना उडविली.
तालुक्यातील काही भागांत मात्र पावसाने हुलकावणी दिली. सोमेश्वर परिसरात मात्र जवळपास दीड तास सोसाट्याचा वारा आणि विजांचा लपंडाव सुरू होता. या परिसराला पावसाने हुलकावणी दिली. बारामती शहर, माळेगाव, पणदरे याशिवाय जिरायती भागालाही पावसाने झोडपून काढले. रविवारी जळगाव क. प. येथे 79 मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले होते. जून महिन्यात दोनवेळा पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने खरीप हंगाम लवकरच सुरू होण्याची आशा शेतकर्यांना आहे.
बारामती शहरातील स्वीमिंग टँकशेजारी पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने रविवारी रात्री तेथे तळ्याचे स्वरूप आले होते. वाहनचालकांची मोठी कसरत त्यामुळे झाली. अनेकांना रस्ता बदलून जावे लागले. बारामती-निरा रस्त्यावर 15 फाट्याजवळ जुने झाड रस्त्यावरच कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. ग्रामस्थ व वडगाव निंबाळकर पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करीत वाहनांना जाण्यासाठी रस्ता करून दिला. निरा डावा कालव्यात अनेक झाडे उन्मळून पडली. 6 जून रोजी ती काढण्यात आली नव्हती.
निरा-बारामती राज्यमार्गावर वादळी वार्यामुळे निरा डावा कालवा परिसरातील झाडे पडून रस्त्यावर आली होती. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. वडगाव निंबाळकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात स्थानिकांच्या मदतीने पडलेली झाडे बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली, तर विद्युत वितरणने ठिकठिकाणी तुटलेल्या तारा जोडून वीजपुरवठा सुरळीत केला.
पावसामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतीला दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यातील शेतकरी उसाच्या लागण हंगामात व्यस्त आहे. सरी काढणे, तोडणे, बेणे आदींची तयारी सुरू असून, 15 जूनपासून प्रत्यक्षात लागण हंगाम सुरू होणार आहे. रविवारी झालेल्या पावसाने तरकारी पिकांना फायदा झाला असून, उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बारामती 47, उंडवडी क. प. 15, सुपा 03, लोणी भापकर 18, वडगाव निंबाळकर 45, माळेगाव कॉलनी 23, पणदरे 12, मोरगाव 16, बर्हाणपूर 42, जळगाव क.प. 79, होळ 19, माळेगाव कारखाना 09, मानाजीनगर 25, चांदगुडेवाडी 34, काटेवाडी 30, अंजनगाव 32, केव्हीके 34, कटफळ 45, सायंबाचीवाडी 35, चौधरवाडी 12, नारोळी 18, कार्हाटी 15, गाडीखेल 77, जराडवाडी 40, पळशी 16, सावंतवाडी 63 आणि मुर्टी 40.
हेही वाचा