

करमाळा : पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील शेटफळ, पोफळज, केडगाव येथे झालेल्या पावसाने परिसरातील अनेक शेतकर्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून, शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.
करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील या परिसरामध्ये केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परिसरातील अनेक शेतकर्यांची केळी कापणीला आली होती. केळी बाजारात पाठविल्यानंतर चांगली आर्थिक कमाई होईल, ही आशा धरुन बसलेल्या शेतकर्यांची पुरती निराशा झाली. गत आठवड्यात सायंकाळी अचानक वादळी वारे सुटले, जोरदार पाऊसही झाला. त्यामूळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकर्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले.
पोफळज येथील बाळासाहेब पवार यांची दोन एकर केळी जमिनदोस्त झाली असून तेरा ते चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच पोफळज येथील मोहन पवार, अरूण पवार, हजारे.शेटफळ येथील धनाजी डिगे, प्रशांत नाईकनवरे, दत्तात्रय गुंड, बाबूराव गुंड, दत्तात्रय पाटील, राहूल घोगरे राजेंद्र साबळे यांच्या केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेे. तालुक्यात केळीबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्ग मधून केली जात आहे.
वादळी वार्यामुळे तालुक्यातील केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना गावपातळीवरील कृषी विभागाच्या कर्मचार्यांना देण्यात आल्या आहेत. याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल व आदेश मिळाल्यानंतर पंचनामे करण्याची कार्यवाही होईल.
– संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा
प्रत्येकवर्षी मे -जून महिन्यात होणार्या वादळी वार्याने केळी पिकाचे मोठे नुकसान होते. केळीचे पीक उभा करण्यासाठी शेतकर्याला एकरी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. मात्र, वादळी वार्याने नुकसान झाल्यानंतर शासनाकडून कसलीही मदत मिळत नाही. हा आमचा गेल्या तीन-चार वर्षांचा अनुभव आहे. प्रशासनाने कायमस्वरुपी शेतकर्यांना मदतीसाठी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.
– प्रशांत नाईकनवरे, नागनाथ शेतकरी गट, शेटफळ