बळीराजाचे डोळे आभाळाकडे ; पाऊस मात्र रूसलेलाच !

बळीराजाचे डोळे आभाळाकडे ; पाऊस मात्र रूसलेलाच !

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा: राज्यात मान्सून नेहमीपेक्षा आठवडाभर अगोदरच हजेरी लावणार, अशा हवामानाच्या अंदाजास अनुसरून शेतकरी शेती कामाचे नियोजन करीत होते. परंतु, जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरीदेखील पाऊस सुरू न झाल्याने शेतकर्‍यांचे शेतीकामाचे नियोजन विस्कळीत होत आहे.

काही शेतकर्‍यांनी शेतीचे मान्सूनपूर्व नियोजन करत रानांची नांगरट केली; मात्र मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने रानातील मातीची ढेकळे तशीच आहेत. पावसाने अजून विलंब केल्यास खरीपातील पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. इतर मशागतीची कामेही लांबणीवर पडू शकतात.

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असून, तो आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. मावळ तालुक्याच्या काही भागातील पाणी पातळी खालावली आहे. पावसास विलंब झाल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई; तसेच जनावरांच्या चार्‍याची टंचाई भासणार आहे. भातशेतीच्या दाहाड (रोपवाटीका) ची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान
होवू शकते.

पाऊस पडेल या आशेवर शेतकरी वर्ग असून, मान्सूनपूर्व तयारी म्हणून शेतकर्‍यांनी बी-बियाणे, खते इत्यादी साहित्याची खरेदी केली
आहे. जूनचा दुसरा आठवडाही संपत आला असून, हवेत अजूनही उकाडा जाणवत आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मावळातीळ डोंगररांगांचाही परिसर पावसाविना उजाड जाणवत आहे. मावळातील निसर्गराजीदेखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news