

मंचर : पुढारी वृत्तसेवा: 'माझी महसूल खात्यात खूप ओळख आहे. तुम्हाला पुनर्वसनाच्या जमिनी नावावर करून देतो,' असे आमिष दाखवून काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शंकर रमाजी करंडे या शेतकर्याकडून 46 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर धोंडू भारमळ, मंदा शंकर भारमळ (दोघे रा. नागापूर, ता. आंबेगाव), लालचंद धोंडू भोकटे (रा. जांभोरी, ता. आंबेगाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर करंडे यांची काठापूर बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमीन आहे.
या जमिनीशेजारी शासनाने पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनी असून, शासनाने अद्याप त्या जमिनी कोणत्याही लाभार्थ्यास दिलेल्या नाहीत. शंकर करंडे यांची ठकसेन गेनभाऊ गभाले (रा. नागापूर) यांच्याशी ओळख आहे. त्याने करंडे यांना फेब्रुवारी 2019 मध्ये नागापूर येथील शंकर धोंडू भारमळ हा पुनर्वसनाच्या जमिनी शेतकर्यांना मिळवून देत असून, तुमच्या शेजारची पुनर्वसनाची जमीन तुम्हाला तो मिळवून देईल, असे सांगितले. त्यानंतर ठकसेन गभाले हा 1 मे 2019 रोजी शंकर भारमळ यास शंकर करंडे यांच्या घरी घेऊन गेला. भारमळने 'माझी महसूल खात्यातील अधिकार्यांशी ओळख असून, तुमच्या जमिनीलगतच्या वरील सर्व शेतजमिनी शासनाकडून तुम्हाला मिळवून देतो,' असे म्हणत विश्वास संपादन केला.
शंकर करंडे यांनी या कामासाठी पैसे लागणार म्हणून पतसंस्थेतून 43 लाख रकमेचे कर्ज काढले. त्यातील 8 लाख रुपये रक्कम रोख व चेकच्या स्वरूपात दि. 22 जुलै 2019 रोजी मंदा शंकर भारमळ हिच्या नावाने दिली आहे. त्यानंतर त्या दोघांनी जमिनीचा प्रस्ताव झाला आहे. अधिकार्यांना, जमीनमालकाला पैसे द्यायचे आहेत, जमीनमालक आजारी आहे. साठेखत करायचे आहे, अशी विविध कारणे सांगून करंडे यांच्याकडून वेळोवेळी एकूण 46 लाख 50 हजार रुपये घेतले.
त्यानंतर जमीन नावावर करून न दिल्याने करंडे यांना शंका आल्याने त्यांनी जमीनमालकाचा शोध घेतल्यावर जमीनमालक रामदास बाबूराव कोकणे (रा. शिनोली, ता. आंबेगाव) याने शंकर धोंडू भारमळ, लालचंद धोंडू भोकटे या दोघांनी माझ्याकडूनही पैसे घेतल्याचे करंडे यांना सांगितले. आजपर्यंत काहीही रक्कम परत केली नसल्याने करंडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास मंचर पोलिस करीत आहेत.
हेही वाचा