पुणेः श्वानाचे पिलू पडले पंधरा लाखांना

पुणेः श्वानाचे पिलू पडले पंधरा लाखांना

पुणेः पुढारी वृत्तसेवा :  बिबवेवाडीतील एका व्यावसायिकाच्या बंद घरावर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारून 45 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल 15 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. नवीन खरेदी केलेले श्वानाचे पिलू आणण्यासाठी कोथरूड येथे गेले असता, चोरट्यांनी पाठीमागे घरात हात साफ केला.

ही घटना सवेरा अपार्टमेंट, डी विंग, बिबवेवाडी येथे सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली
आहे. याप्रकरणी, प्रवीण रमेश कांडपिळे (वय 48, रा. सवेरा अपार्टमेंट) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांडपिळे यांचा मार्केट यार्ड येथे गाळा असून, ते होलसेल दरात भाजी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी कोथरूड येथून एक श्वानाचे लहान पिलू खरेदी केले होते. ते आणण्यासाठी कांडपिळे आणि त्यांच्या घरातील व्यक्ती कोथरूड येथे सोमवारी दुपारी गेले होते.

त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कांडपिळे यांच्या घराच्या गॅलरीचे लोखंडी ग्रील कशाच्या तरी साह्याने तोडून, वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घराच्या समोरील दरवाजा न तोडता इमारतीच्या स्लॅबवरून त्यांच्या गॅलरीत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमधील कबर्डमध्ये ठेवलेले 45 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 1 लाख 20 हजार रुपयांची रोकड चोरी करून पळ काढला. कांडपिळे हे घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले.

त्यानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपायुक्त नम—ता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पथकांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक काळुखे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news