राजकीय आखाड्यासाठी सुरतच का? | पुढारी

राजकीय आखाड्यासाठी सुरतच का?

सुरत : वृत्तसंस्था :  शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुजरातेतील सुरतेचीच निवड का केली, असा प्रश्‍न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. एक तर गुजरातची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. सुरत हे शहर मुंबईपासून तीन-चार तासांच्या अंतरावर आहे. दुसरे म्हणजे गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला आहे. महत्त्वाचे म्हणजे गुजरात भाजपचे अध्यक्ष एक मराठी आहेत आणि त्यांचा भाजप-शिवसेनेसह महाराष्ट्रातील नेत्यांशी नियमित संवाद आहे.

गुजरातेत गेल्या 24 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान, गृहमंत्री याच राज्याचे आहेत. ‘ऑपरेशन लोटस’साठी त्यामुळेही सुरतची निवड करण्यात आली. बंडखोर आमदारांना मुंबईत एखाद्या हॉटेलात मुक्‍कामी ठेवले असते तर शिवसैनिकांकडून तोडफोडीची शक्यता होती. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार असल्यघने अन्य धोकेही होतेच. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. ते नवसारी मतदारसंघाचे खासदार आहेत. असे असले तरी सुरत हे सी. आर. पाटील यांचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. बंडखोर आमदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव येता कामा नये, याची जबाबदारी पेलण्याची क्षमता सी. आर. पाटील यांच्यात आहे.

कसे आहे हॉटेल?

सुरतच्या दममस रोडवर हे हॉटेल असून पंचतारांकित सुविधांनी ते सुसज्ज आहे. तब्बल 170 खोल्यांच्या या हॉटेलात स्विमिंग पूल व जिमसह सर्वच अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळेच देश-विदेशातील पाहुण्यांची या हॉटेलला पसंती असते. हॉटेलमध्ये एक आलिशान हॉल आणि रेस्टॉरंटही आहे. पूर्वी भगवती नावाने ओळखले जाणारे हे हॉटेल ल मेरिडियनने 2019 मध्ये खरेदी केले होते.

Back to top button