पुणे : सोमेश्वरला रंगले पहिले अश्वरिंगण

संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडले.
संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडले.

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥
हेचि मज पडो जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ॥

असे अभंग म्हणत टाळ-मृदंगाच्या गजरात संत सोपानदेव पालखी सोहळा मंगळवारी (दि. 28) रोजी सोमेश्वर कारखान्यावर विसावला. सकाळी दहाच्या सुमारास सोहळा निंबूत येथून पुढे मार्गस्थ झाला. सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सोहळ्यातील पाहिले अश्व रिंगण पार पडले. वारकर्‍यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे रिंगण पार पडले.

निंबूत येथील मुक्काम सकाळी उरकून सोहळा न्याहरीसाठी निंबुत छपरी येथे विसावला. याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, संचालक लक्ष्मण गोफणे, उपसरपंच अमर काकडे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने न्याहारी देण्यात आली. दुपारच्या जेवणासाठी पालखी सोहळा वाघळवाडी येथे विसावला. यंदा प्रथमच पालखी अंबामाता मंदिर या ठिकाणी विसाव्यासाठी ठेवण्यात आली.

सडा, रांगोळ्या आणि कमानी

ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत गावकर्‍यांनी आनंदाच्या वातावरणात रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण रांगोळी काढून, निरा-बारामती रस्त्यावर स्वागत कमानी उभारून, पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नंदा सकुंडे यांनी सत्कार केला. या वेळी उपसरपंच जितेंद्र सकुंडे, माजी सरपंच सतीश सकुंडे, सुचिता साळवे, तुषार सकुंडे, ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड उपस्थित होते. दुपारी चार वाजता पालखी रिंगणासाठी मु. सा. काकडे महाविद्यालयात दाखल झाली.

महाविद्यालयात रिंगण सोहळ्यासाठी सोहळा विसावल्यानंतर प्रथम सोपानकाकांच्या पादुकांचे गोल रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर अंजनगाव येथील परकाळे यांच्या मानाच्या अश्वाने दोनवेळा गोल रिंगण पूर्ण करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर झेंडेवाले, विणकर तसेच वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकर्‍यांनी विठुनामाचा गजर पूर्ण करीत गोल रिंगण पूर्ण केले. वडगाव निंबाळकर सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त व वाहतूकव्यवस्था ठेवण्यात आली होती.

साईसेवा हॉस्पिटलच्या वतीने वारकर्‍यांसाठी आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते. महसूल विभाग, सोमेश्वर कारखाना प्रशासन, आरोग्य विभाग, सोमेश्वर महावितरण यांनी पालखी सोहळ्याला सहकार्य केले. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा मुक्कामासाठी सोमेश्वर कारखान्याच्या शिवाजी प्रांगणात विसावला. सोमेश्वर कारखान्याच्या वतीने सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, संचालक संग्राम सोरटे, शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड , कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी पालखीचे स्वागत केले. कारखान्याच्या वतीने वारकर्‍यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. दर्शनासाठी सोमेश्वरसह मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, करंजेपुल, करंजे, सोरटेवाडी, मगरवाडी, चौधरवाडी येथील भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news