पुणे : पुढारी वृत्तसेवा
'रासायनिक खताचा वापर कमी करून जुन्या पध्दतीचे बीज वापरून विषमुक्त अन्नधान्य पिकविले, तर सुदृढ पिढी घडू शकेल,' असे मत अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
एमआयटीच्या स्कूल ऑफ सस्टनेबिलिटी स्टडीज व निनॉक्स नेचर क्लब यांच्यातर्फे अर्थशास्त्र 2022 या कार्यक्रमात पोपेरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड होते. या वेळी टेर पॉलिसी सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, अॅग्रो टुरिझमचे प्रणेते पांडुरंग तावरे आणि बांबू उत्पादक व संशोधक संजीव करपे यांच्यासह एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आदी उपस्थित होते.
पोपेरे म्हणाल्या, 'मी कुठलेही शिक्षण घेतलेले नाही. मी एक ऊसतोड कामगारच होते. परंतु, माझे वडील आणि निसर्ग यांनीच मला शिकविले. आज शेतीमध्ये हायब्रिड अन्नधान्य व भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यासाठी पारंपरिक वाण वापरून उत्पादन केल्यास जमिनीचा र्हास कमी होईल आणि दर्जेदार उत्पादन होऊन सुदृढ पिढी घडेल.'
डॉ. कराड म्हणाले, 'शेती, कृषी पर्यटन आणि बांबूची शेती, यावर ग्रामीण भागातील शेतकर्यांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी समृध्द झाला की समाज समृद्ध होईल. त्यातून देशाचा विकास होईल. प्रत्येकाने निसर्ग तत्त्वाचे पालन केल्याने विकासाबरोबरच समाजात सुख, समाधान आणि शांती नांदेल.' या वेळी राजेंद्र शेंडे, संजीव करपे, पांडुरंग तावरे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.