पुणे : बंद जलतरण तलावासाठी लाखोंचा खर्च

गोंधळेनगर येथील जलतरण तलाव लोकार्पणापासून गेले पाच वर्षे बंदच आहे.
गोंधळेनगर येथील जलतरण तलाव लोकार्पणापासून गेले पाच वर्षे बंदच आहे.

हडपसर : पुढारी वृत्तसेवा

गोंधळेनगर येथील कै. रामचंद्र अप्पा बनकर क्रीडा संकुलातील जलतरण तलाव गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. मात्र आताही पालिकेने या बंद तलावासाठी पुन्हा लाखो रुपये खर्च केला आहे. एवढे करूनही हा तलाव अद्याप खुला न झाल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हडपसर येथील बनकर क्रीडा संकुलात आर. आर. पाटील जलतरण तलाव, स्वर्गीय विलू पूनावाला बॅडमिंटन हॉल आणि व्यायामशाळा आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प लोकार्पण झाल्यापासून पाच वर्षे बंदच आहे. त्याचा फायदा अद्यापही नागरिकांना मिळालेला नाही. या बंद प्रकल्पावर या वर्षी पुन्हा तीस लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. तरीही तो नागरिकांसाठी उपलब्ध का नाही, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

जलतरण तलावाबरोबरच या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, व्यायामशाळा आदी सुविधांचाही उपभोग नागरिकांना घेता येत नाही. गोंधळेनगर, सातववाडी परिसरातील नागरिकांना या सुविधांसाठी बाहेर फिरावे लागत आहे. सुविधा असूनही पालकांना जलतरणासाठी आपल्या पाल्यांना दूरच्या ठिकाणी न्यावे लागत आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या जयश्री तांबोळे यांनी केली आहे. क्रीडा संकुलातील सुविधा सामान्य नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

दोन वर्षे कोरोनात गेली त्यामुळे तलाव बंद होता. पण आता लवकरच काम सुरू होईल.

                                        – वैशाली सुनील बनकर, माजी नगरसेविका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news