

चाकण : पुढारी वृत्तसेवा : जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याचा परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे. मात्र, अशातच दडी मारून बसलेल्या पावसाचे आता खेड तालुक्यात पुनरागमन झाले आहे. परिणामी शेतकर्यांच्या मनाला अंकुर फुटले असून, शेतीकामांना वेग आला आहे. मात्र, पावसात अद्यापही सातत्य दिसत नसल्याने शेतकरी धास्तावलेलाच आहे.
एक दिवस येणारा पाऊस दुसर्या दिवशी दडी मारत असल्याचे चित्र मागील आठवडाभरात पाहावयास मिळत आहे. शेतकर्यांनी आता शेतीच्या कामांना सुरवात केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात आले होते. दरम्यान, आठवड्यापासून अधून-मधून पाऊस सुरू झाला असून, संततधार पावसाची शेतकर्यांना अजूनही प्रतीक्षा आहे.
सध्या होणार्या पावसावर शेतकरी प्रफुल्लित झाला असून, शेतात नांगरणीही सुरू झाली आहे. तालुक्याच्या अनेक भागांत संपूर्ण जून महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. त्यामुळे या भागात अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी प्रमाण अत्यंत कमी आहे. चाकणमध्ये मंगळवारी पावसाने हजेरी लावली; मात्र बुधवारी (दि.29 ) पुन्हा एकदा दडी मारल्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले.