पुणे : जिल्ह्यात 123 पाण्याचे स्रोत दूषित

पुणे : जिल्ह्यात 123 पाण्याचे स्रोत दूषित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 123 जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण आंबेगाव तालुक्यात आहे. आंबेगावमध्ये 35 जलस्रोत हे दूषित पाण्याचे आढळले.
2 हजार 408 पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते, म्हणजे तपासण्यात आलेल्यांपैकी 5 टक्के स्रोत दूषित आढळले असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील पाण्याचे नमुने एकत्रित करून तपासणीसाठी पाठविले जातात. प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासल्यानंतर अहवाल तयार करण्यात येतो. वीस टक्क्यांहून कमी क्लोरीन असलेल्या गावांची संख्या चार आहे, त्यामध्ये जुन्नरमधील चीलेवाडी, अहिनवेवाडी, अंबेगवान तर शिरूरमधील साविंदने यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये या गावांमध्ये पाण्याची टाकीची दुरवस्था, जलवाहिन्यांना गळती, ठिकठिकाणी उकिरडा पडल्याची विदारक स्थिती आढळून आली. त्यानुसार संबंधित सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना कळवण्यात आले आहे. नियमित शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले आहेत.

याचबरोबर पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीने टीसीएलचा वापर परिणामकारक वापर, आवश्यक तेथे तुरटीचा वापर तसेच पाण्यातील क्लोरीन तपासणीसाठी क्लोरोस्पोपचा वापर व या अनुषंगाने ठेवायच्या नोंदवह्या ठेवाव्यात. त्याचबरोबर पिणाच्या पाणी स्त्रोतांच्या शंभर फुट परिसरातील स्वच्छता करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

दूषित पाणी पिल्याने विविध आजारांचा त्रास
दूषित पाणी पिल्याने आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीती देखील असते.

तालुकानिहाय दूषित जलस्रोत
आंबेगाव – 35
बारामती – 8
भोर – 2
दौंड – 6
हवेली – 13
इंदापूर – 12
जुन्नर – 8
खेड – 6
मावळ – 0
मुळशी – 3
पुरंदर – 3
शिरूर – 26
वेल्हे – 1

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news