धनगर आरक्षणाचा प्रस्ताव मविआ सरकारकडूनच; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

धनगर आरक्षणाचा प्रस्ताव मविआ सरकारकडूनच; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, यासाठीचा ठराव महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केंद्राकडे पाठवला जाईल. यासंबंधी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून हा ठराव पाठवण्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. आम्ही ठराव पाठवणार, एकदा कळू द्या की, कोणाच्या मनात आरक्षण द्यायचे नाही, असेही ते म्हणाले.

अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने बारामतीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती सोहळ्यात ते बोलत होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, दिगंबर दुर्गाडे, दत्तात्रय येळे, संभाजी होळकर, मदनराव देवकाते, सचिन सातव, संदीप जगताप, प्रमोद काकडे, संग्राम सोरटे, सुनील भगत, लालासाहेब माळशिकारे, वनिता बनकर, भाग्यश्री धायगुडे आदींची या वेळी उपस्थिती होती. आज प्रत्येक जाती-धर्मात महापुरुष विभागले गेले आहेत.

महापुरुषांचे कार्य हे केवळ एका जाती-धर्मापुरते मर्यादित नव्हते, त्यामुळे महापुरुषांची जयंती ठराविक समाजाने नव्हे तर सर्व समाजबांधवांनी साजरी करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले. राज्यमंत्री भरणे म्हणाले, देशात- राज्यात कोणताही प्रश्न असो, त्याचे शरद पवार हे एकच औषध आहे. मंत्रिपद हे रुबाब दाखवण्यासाठी, हिरोगिरी करण्यासाठी नसते, तर ते जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. समाजबांधवांनी पवार कुटुंबीयांनी दिलेले योगदान जाणावे.

काही लोक येतात, आरक्षणाच्या मुद्द्यावरून डोकी भडकवण्याचे काम करतात, समाजाने त्यांचा इतिहास तपासावा, असे भरणे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी 14.50 कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच तेथे त्यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले. सनी पाटील यांनी स्वागत केले. ज्ञानदेव बुरुंगले व कुमार देवकाते यांनी सूत्रसंचालन केले.

आमचीच ब्रेकिंग व्हायची
खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमासाठी पोहोचू शकले नाहीत. तिकडे मुंबईत विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआची महत्त्वाची बैठक पार पडते आहे. तेथे माझ्यासह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची अनुपस्थिती असल्याने काही वेळात आमचीच ब्रेकिंग होईल, असे धनंजय मुंडे म्हणाले. पण अजित पवार यांच्या निरोपामुळेच ऐनवेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. पक्षाचा विश्वास असल्याने विश्वासराव देवकाते यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आल्याचे ते म्हणाले. कोणाचं रक्ताचं, कोणाचं जाती-पातीचं, कोणाचं मातीचं नातं असतं, पण आमचं बारामतीशी विश्वासाचं नातं असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news