

पुणे, पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने नुकतेच नवी दिल्ली येथे 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली. कोविड-19 विलंबामुळे, या वर्षीच्या समारंभात 2020 मधील चित्रपटांना अनेक श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात, एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म आणि थिएटरच्या अंतिम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी विशेष अय्यर याच्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट फिल्म 'परीह'ने 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार जिंकला.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना विशेष अय्यर म्हणाला, की "राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मला आनंद झाला आहे. याचे श्रेय प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि एमआयटी एडीटीच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँड थिएटरचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँड थिएटरचे संपूर्ण प्राध्यापक आणि कर्मचारी यांना जाते. हा चित्रपट दिग्दर्शित करताना आणि शूटिंग करताना आम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, पण त्या प्रवासातील प्रत्येक सेकंद विशेष आणि समाधान देणारा होता. या प्रयत्नाची ओळख मिळाल्याने मला आनंद होत आहे."
विशेष अय्यरला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, एमआयटी-एडीटीयूचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अमित त्यागी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.