‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदीच; महापालिका प्रशासनाची पुन्हा स्पष्टोक्ती

October Sankashti Chaturthi
October Sankashti Chaturthi

पुणे : पुढारी वृत्तसेवा: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या विक्रीवर आगामी गणेशोत्सवात बंदीच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 मे 2020 रोजीच काढले आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासनाने वारंवार मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळावा, असे आवाहन केले.

यासंदर्भात गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही बाहेरील जिल्ह्यांतून अथवा राज्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, गणेशमूर्तिकारांनी पीओपीच्या लाखो गणेशमूर्ती तयार केल्या आहेत, तसेच विक्रेत्यांनीही मूर्तींची खरेदी केलेली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पीओपीच्या मूर्तींवर बंदीच राहणार असल्याचे व आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी नैसर्गिक प्रवाहात अर्थात नदी, कालवा, तलाव आणि विहिरीमध्ये मूर्तींचे विसर्जन करू नये. त्याऐवजी घरच्या घरी मूर्तिविसर्जन अथवा मूर्तिदान करावे. घरच्या घरी मूर्तिविसर्जनासाठी महापालिका गेली काही वर्षे नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट मोफत उपलब्ध करून देत आहे. महापालिकेकडे अमोनियम बायकार्बोनेटचा पुरेसा साठा असल्याने यंदा खरेदी केली जाणार नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news