म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : कोलवाळ येथील तुरुंगात अमलीपदार्थ पुरविल्याप्रकरणी पोलिसांनी योगेश पागी (रा. काणकोण) याला शनिवारी (दि.25) अटक केली. दोन दिवसापूर्वी सुरज गावडे या कोलवाळ तुरुंगाच्या तुरुंग रक्षकाला (जेलगार्ड) तुरुंगात अमली पदार्थ नेताना अटक करण्यात आली होती. सुरज याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारावाई करण्यात आली.
कोलवाळ तुरुंगात असलेला कैदी विकट भगत (रा. काणकोण) याच्यासाठी गावडे याने अमली पदार्थ आणला होता. सदर अमली पदार्थ योगेश पागी याने सुरज गावडे याच्याकडे भगत यास देण्यासाठी दिला होता, असे गावडे याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार दि.25 रोजी सापळा रचण्यात आला व रात्री उशिरा योगेश याला आगोंद काणकोण येथून अटक करून कोलवाळ पोलीस स्थानकात आणण्यात आल्याची माहिती दळवी यांनी दिली. ट्रान्सफर वॉरंटच्या माद्यमातून भगत यालाही पोलिसांनी ताब्यात मागितले आहे. पोलिस अधीक्षक शोबीत सक्सेन आणि उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक सोमनाथ म्हाजिक तपास करत आहेत.