कार्ला : पुढारी वृत्तसेवा: पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळ शिलाटणेच्या हद्दीत भरधाव कंटेनरने पुढे जाणार्या एका मोटारसायकलला मागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल वरील तीन वर्षांच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि.27) सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.
पुष्पा पवन शर्मा (26), युवराज पवन शर्मा (3 वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकाचे नाव असून, पवन गणपतीलाल शर्मा (27, तिघेही सध्या रा.निगडी, मूळ रा. राज्यस्थान) असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन शर्मा हे त्यांच्या मोटारसायकवरून क्र. (एमएच-14 जेझेड 1984) त्यांची पत्नी पुष्पा व त्यांचा तीन वर्षाचा लहान मुलगा युवराज हे तिघे लोणावळ्यात फिरायला गेले होते. लोणावळ्यात फिरून झाल्यानंतर ते पुन्हा निगडीला घरी चालले होते. कार्ला फाट्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीत त्यांच्या मोटारसायकलला मागून भरधाव आलेल्या कंटेनरने क्र. (एमएच 46 डीएफ 5833) ने जोरात धडक दिली. या भीषण धडकेत मोटारसायकल वरील तीन वर्षांचा बालक आणि त्याची आई व वडील मोटारसायकलसह महामार्गावर फेकले गेले.
या भीषण घटनेत युवराज व त्याची आई पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील पवन शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनेनंतर कंटेनरचालक अपघातस्थळावरून पळून गेला आहे. तत्पूर्वी स्थानिकांनी जखमी झालेल्या पवन शर्मा यांना उपचारासाठी कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी शरद जाधवर हे करीत आहेत.
हेही वाचा