सांगली ः पुढारी वृत्तसेवा सलग तीन वर्षे सांगलीत महापूर आल्याने त्याचा फटका पोलिसांच्या वसाहतीला बसला आहे. सलग आठ-नऊ दिवस वसाहतीमधील घरात पाणी साचून राहिल्याने घरांची पडझड झाली आहे. शासनाने दुरुस्तीसाठी काहीच प्रयत्न न केल्याने 182 कुटुंबांना घरे सोडावी लागली आहेत. सध्या ते कुटुंबांसह भाड्याने खोली घेऊन राहत आहेत. रिसाला रस्ता, सिटी पोस्ट व सीआयडी कार्यालय या तीन ठिकाणी शहरात पोलिसांच्या वसाहती आहेत. या वसाहती बांधून पन्नास वर्षे होऊ गेली आहेत. गेली तीन वर्षे शहरात आलेल्या महापुराचे पाणी वसाहतीमध्ये शिरले. आठ-नऊ दिवस पाणी साचून राहिले. त्यामुळे भिंती भिजून पडल्या. कौले फुटली गेली. फरशी निघाली. चौकटी, खिडक्या व दारे लाकडी असल्याने त्या कुजल्या आहेत.
पूर ओसरल्यानंतर पोलिस कुटुंबे पुन्हा वसाहतीमध्ये परतली. स्वत:च्या खिशातील पैसे घालून त्यांनी थोडीफार दुरुस्ती करुन घेतली; पण पुराचे संकट पुन्हा आले. तीन वषार्ंच्या पुराने वसाहत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या घरामध्ये राहणेही अवघड बनल्याने पोलिस कुटुंबांना वसाहत सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही.तीन वसाहतीमधील 182 कुटुंबांनी घरे सोडली. त्यांनी दुसरीकडे भाड्याने खोल्या घेतल्या. ज्यांना स्वत:चे घर नाही, त्यांना शासनाकडून पगारातून भत्ता दिला जातो. सेवा किती झाली आहे, हे पाहून भत्ता दिला जातो.
साधारपणे साडेतीन हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत भत्ता दिला जातो. हा भत्ता तटपुंजा असल्याने पोलिसांना स्वत:च्या खिशातील पैसे घरभाडे देण्यासाठी मोजावे लागत आहे. वसाहत दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक पोलिसांच्या घराचे कुलुपे, कडी व कोयंडा चोरट्यांनी तोडून नेले आहेत. कौलेही चोरण्याचे प्रकार घडत आहेत. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दोन हजारहून अधिक नवीन घरे बांधण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. गृहविभागानेही याकडे दुर्लक्ष केले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
सापांनी केला अड्डा : परिसराला धोका
सीआयडी कार्यालयाजवळ सांगली कारागृहाची संरक्षक भिंत आहे. या भिंतीला लागून खंदक आहे. महापुरामुळे साप, घोणस मोठ्या प्रमाणात आले आहेत. या खंदकात साप व घोणस होते. आता त्यांनी आजू-बाजूच्या रिकाम्या असलेल्या पोलिस वसाहतीमध्ये अड्डा केला आहे. केव्हाही साप निघू लागल्याने पोलिस कुटुंबे घाबरून गेली आहेत. तसेच खोल्यांची पडझड झाल्याने त्या सोडण्यातच त्यांनी धन्यता मानली.
तीन वसाहती रिकाम्या
सिटी पोस्टासमोर : 132 घरांची वसाहत
रिसाला रस्ता : 30 घरांची वसाहत
सीआयडी कार्यालयासमोर : 20 घरांची वसाहत
शहराच्या मध्यभागी एकूण : 182 पोलिस कुटुंबांची वसाहत