

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील चांगले डांबरी रस्ते खोदून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. 'श्रीमंत' महापालिका असल्याने तसेच, रस्ते कामाबाबत निश्चित असे नियम व धोरण नसल्याने छोटे व मोठे तसेच, गल्लीबोळात सरसकट काँक्रीटचे रस्ते बनविले जात आहेत. एकप्रकारे रस्त्यांचे पेवच फुटले आहे. अशा रस्त्यांवर ड्रेनेज, पाणी व इतर सेवावाहिन्यांच्या दुरूस्तीसाठी अधिक खर्च होतो. रस्ते पुन्हा सुस्थितीत होत नसल्याने शहरात नवीन समस्या निर्माण होत आहे.
सुस्थितीतील डांबरी रस्ते तोडून काँक्रीटचे रस्ते केले जात आहेत. ते काम संथ गतीने होत असल्याने नागरिकांना धूळ, माती व खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. 12 मीटरपेक्षा कमी रूंदीचे लहान व मोठे सर्वच रस्ते सरसकट काँक्रीटचे केले जात आहेत. वारंवार रस्ते काम करायला नको म्हणून माजी नगरसेवक व अधिकार्यांच्या आग्रहामुळे शहरात काँक्रीटचे रस्ते बनविण्याचा सपाटा सुरू आहे. त्यासाठी स्थापत्य विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो.
रस्त्यापेक्षा वाढीव खर्चाच्या 'टक्केवारी'वर अनेकांचे लक्ष असते. त्यामुळे काही ठिकाणी दर्जा राखला जात नाही. परिणामी, रस्त्यास भेगा पडतात. दापोडी ते निगडी जुन्या महामार्गावरील काँक्रीटच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पिंपळे गुरवला निकृष्ट रस्ते खोदून नव्याने करावे लागले.
काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी डांबरी रस्त्यापेक्षा 30 टक्के इतका अधिक खर्च येतो. काँक्रीट रस्त्यावर ड्रेनेज, पाणी, विद्युत व इतर सेवावाहिन्यांच्या दुरूस्तीसाठी खोदकाम केल्यास ते त्रासदायक व खर्चिक होत आहे. जलवाहिनी फुटल्यास किंवा ड्रेनेज तुंबल्यास काँक्रीटचे रस्ते फोडावे लागतात. त्यामुळे दुरूस्तीस अधिक वेळ लागून नागरिकांची गैरसोय होते.
'जागा तेथे' पेव्हिंग ब्लॉक लावण्याचा धडाका
रस्त्याच्या कडेला, चौकात, पदपथावर, गल्ली, उद्यान, ये-जा करण्याचा रस्ता आदी जागा मिळेल त्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविले जातात. जुने पेव्हिंग ब्लॉक काढून लाल, काळा, पिवळा, पांढर्या, राखाडी रंगाचे ब्लॉक बसविले जात आहेत. चमकणार्या व आकर्षक रंगातील ब्लॉक बसविण्यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. वाहनांच्या व नागरिकांच्या वर्दळीमुळे काही दिवसात हे ब्लॉक हलू लागतात. एक ब्लॉक तुटला किंवा निघाल्यास सर्व ब्लॉक खिळखिळे होतात. त्यामुळे वाहनांना विशेषत: दुचाकीस्वार दुचाकी घसरून पडतात. पावसाळ्यात ब्लॉक खाली पाणी साचल्याने वाहन गेल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या अंगावर घाण पाणी उडते.
तापमान,भूजल पातळीत घट
शहरात अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते झाल्याने उन्हात ते रस्ते मोठ्या प्रमाणात तापतात. इमारतींच्या दाटीवाटीत रस्तेही तापू लागल्याने वातावरणातील तापमान प्रचंड वाढत होते. पाणी काँक्रीट रस्त्यावर मुरत नसल्याने जमिनीतील पाण्याची पातळी घटल्याच्या तक्रारी काही भागात वाढल्या आहेत. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात अनेक बोअरींगचे पाणी कमी झाले किंवा बंद झाले. त्यामुळे हाउसिंग सोसायटींतील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. तसेच, या रस्त्यामुळे वाहनांच्या चाकांची अधिक झीज होत असल्याची तक्रार आहे.
चाचणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार काँक्रीटचे रस्ते : आयुक्त
दहा वर्षे झालेल्या डांबरी रस्त्याची चाचणी केल्यानंतर रस्त्याचे उर्वरित आयुष्य 15 टक्केपेक्षा कमी असल्यास, डांबरीकरणाच्या आच्छादनासाठी येणारा खर्च व नव्याने करावयाचा काँक्रीटीकरणाचा खर्च यांची तुलना करून रस्ता संपूर्णपणे काँक्रीटचा करण्याचा निर्णय घ्यावा. फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर मशिनद्वारे चाचणी करून ते निश्चित करावे, अशा सूचना स्थापत्य विभागास दोन महिन्यापूर्वी दिल्या आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले. तसेच, पुढील तीन वर्षात नवीन व मुख्य रस्त्याच्या पदपथासाठी पेव्हिंग ब्लॉक वापरण्याचे आदेश मे महिन्यास अखेरीस देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
1,225 डांबरी, 100 किमीचे क्राँकीट रस्ते
शहरात दरवर्षी रस्ते दुरूस्त करून नवीन केले जातात. समाविष्ट भागातील कमी रूंदीचे व मातीचे रस्ते नव्याने विकसित केले जात आहेत. सध्यस्थितीत शहरात 1 हजार 225 किलोमीटर लांबीचे डांबरी रस्ते आणि 100 किलोमीटर लांबीचे काँक्रीट रस्ते आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही
काँक्रीटच्या रस्त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. ते रस्त्यावर साचून राहते. पालिकेतर्फे ड्रेनेज व पावसाळी गटार्यांची व्यवस्थित सफाई केली जात नाही. ड्रेनेज झाकणावरील दगड व माती न हटविल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे उतरावरील घर किंवा इमारतींमध्ये पाणी शिरते.