पिंपरी : वायसीएम रुग्णालयामध्ये ‘प्रहार’चे आंदोलन

पिंपरी : वायसीएम रुग्णालयामध्ये ‘प्रहार’चे आंदोलन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा:  प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अपंगांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात येणार्‍या अडचणींबाबत आंदोलन करण्यात आले. यावेळी वायसीएम रुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र वाबळे यांनी आंदोलकांबरोबर बैठक घेऊन त्वरित उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले.  त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये अनेक अपंगांनी वायसीएम रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक अडचणी येत असल्या बाबतच्या तक्रारी केल्या होत्या. त्यासाठी सर्व अपंगांसह प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रेय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी यांच्या नेतृत्वाखाली वायसीएम रुग्णालय येथे अपंगांनी हे आंदोलन केले.

अपंगांना प्रवेशद्वाराजवळ वाहन लावण्यासाठी आरक्षित जागा असावी, प्रवेशद्वारावरच अपंग प्रमाणपत्र मिळण्याचे वार व त्याबाबतची माहिती ठळक अक्षरात असणारा फलक लावण्यात यावा, केस पेपरसाठी अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र लाईन,ज्या दिवशी येईल त्याच दिवशी प्रमाणपत्र देण्यात यावे, अपंग प्रमाणपत्रासाठी कोणतीही फी आकारू नये, अनेक प्रमाणपत्रामध्ये असणारी तफावत दूर करणे, या मागण्या यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आल्या.

याबाबत रुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र वाबळे यांनी संबंधित सर्व डॉक्टरांसह प्रहारच्या शिष्टमंडळाची त्वरित बैठक घेतली.लेखी उत्तर दिले असल्याने एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित केले असल्याचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news