सातारा : कमी पाण्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा

सातारा : कमी पाण्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : सन 2021-22 या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत निर्मितीसाठी अभूतपूर्व पाणी वापर झाला. यामुळे कोयना धरणात नव्या वर्षारंभाला कमी प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने आता धरणातील शिल्लक पाणी पाणीसाठा लक्षात घेता पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी मर्यादा आल्या आहेत.

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 11.264 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाल्याची तांत्रिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोयना धरणांतर्गत विभागात गत पावसाळ्यात परिसरातील शंभर तर धरण निर्मितीनंतरच्या साठ वर्षातील अनेक नैसर्गिक विक्रम मोडीत निघाले. याच नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीवर मात करत राज्यातील कोळसा टंचाईच्या काळात झालेली विजेची गरज भागवण्याससह अगदी तांत्रिक वर्षाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोयनेतून अखंडित वीजनिर्मिती झाली. लवादाच्या आरक्षित 67.50 टीएमटीच्या कोट्यापेक्षाही पंधरा टीएमसी अतिरिक्त पाणी वापरासाठी शासन, प्रशासनाने दाखवलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे कोयनेतून यावर्षी सरासरीच्या तब्बल 652 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली. यातून राज्य महसुलात भर पडत राज्यावरचे भारनियमनासह अंधाराचे सावट दूर झाले. अतिरिक्त पाणीवापर झाल्याने धरणात सध्या कमी पाणी आहे.

15 जूनपर्यंत कोयना धरणाच्या चार जलविद्युत प्रकल्पातून 97.576 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 11.264 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे . या पंधरवड्यात पश्चिमेकडे 2.08 टीएमसी पाण्यावर 90.460 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 2.27 टीएमसी वर 107.377 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी पश्चिमेकडे 0.24 टीएमसी पाणीवापर कमी झाला व परिणामी 16.917 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. या पंधरवड्यात सिंचनाच्या 2.43 टीएमसी पाण्यावर 7.116 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठीच्या 0.40 टीएमसी पाण्यावर 1.463 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 2.03 टीएमसी पाणीवापर ज्यादा झाला. यामुळे 5.653 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता पहिल्या पंधरवड्यात एकूण 4.51 टीएमसी पाण्यावर 97.576 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 2.67 टीएमसी पाण्यावर 108.840 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चार प्रकल्पांसाठी ज्यादा 1.84 टीएमसी पाणीवापर झाला. त्यापैकी ज्यादा पाणी पूर्वेकडे वापरल्याने 11.264 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news