

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितोद्धाराची चळवळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जिद्दीने व ताकदीने पुढे नेली. त्याप्रमाणे जातीचे वाण ओलांडून संघटन बांधल्याशिवाय संघटना उभे राहत नाही. गाव, तालुका व जिल्हास्तरावरील समितीमध्ये जोपर्यंत एकजूट नाही, तोपर्यंत सामाजिक परिवर्तन सांगण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
बहुजन रयत परिषदेची राज्यस्तरीय चिंतन बैठक इंद्रायणीनगर, भोसरी येथील राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालय येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. परिषदेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवनिर्धार संवाद अभियान 18 जुलै ते 5 सप्टेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. बैठकीस परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, सचिव रवींद्र वाकळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल साळुंखे, युवक प्रदेशाध्यक्ष अभिजीत ढोबळे, नाम साठे, बालाजी गायकवाड, ईश्वर क्षीरसागर व पदाधिकारी
उपस्थित होते.
भोसरीत झालेल्या बहुजन रयत परिषदेची राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना प्रा. लक्ष्मण ढोबळे. समवेत पदाधिकारी. ढोबळे म्हणाले की, राज्यातील 59 जातीचा अ, ब, क, ड प्रवर्गाप्रमाणे आरक्षण लागू करावे. मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहातील 8 हजार 104 कर्मचार्यांना वेतनश्रेणीप्रमाणे पगार द्यावा.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे. कर्मवारी दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा जमीन वाटपाचा कार्यक्रम राबवावा. महिला बचत गटाला महाराष्ट्र सरकारने कर्जाचा आधार द्यावा. विकास महामंडळांना 1 हजार कोटींचे भागभांडवल देण्यात यावे. वीर लहुजी साळवे आयोगातील 82 शिफारसी लागू कराव्यात, आदी मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.