पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीवर मदार; काँग्रेस संभ्रमात

पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीवर मदार; काँग्रेस संभ्रमात
Published on
Updated on

राहुल हातोले

पिंपरी : महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजल्याने काँग्रेसने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, महाविकास आघाडी शहरात होणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था आहे. महाविकास आघाडी झाली तर किती आणि कुठल्या जागा सोडाव्या लागतील व महाविकास आघाडी होणार की नाही? याबाबत शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मित्र पक्षांना आम्ही ठरवू तेवढ्या जागा देऊ अन्यथा 'एकला चलो रे'ची भूमिका घ्यावी लागणार, असे सांगितल्याने काँग्रेसची मुस्कटदाबी होण्याचे चिन्ह आहे. शहराध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ. कैलास कदमांकडे शहर काँग्रेस पक्षाची धूरा आली आहे. गेल्या निवडणुकीत माजी शहराध्यक्ष सचिन साठे असताना 65 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले होते.

मात्र पक्षाला भोपळा फोडता आला नव्हता, त्यामुळे या निवडणूकीत पक्षाच्या विद्यमान अध्यक्षांवर अधिक जबाबदारी आली आहे. नव्याने निवड झालेल्या डॉ. कदमांनी शहरात पक्ष चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी उपोषण, महागाई विरोधात भोंगा आंदोलन, केंद्राने कामगारविरोधी केलेल्या नियमांविरूध्द इंटक संघटनेच्या माध्यमातून शहरात पुकारलेला बंद तसेच याबाबत दुचाकी रॅलीच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देऊन शहरात विरोधी पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडली आहे.

मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर असलेले सचिन साठे तसेच शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदावर असलेले दिलीप पांढारकर आदींचे अंतर्गत गटतट पडल्याची पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये खासगीत चर्चा आहेत. अंतर्गत कलहाचा फायदा इतर पक्षांना होऊन काँग्रेसला पराभवालाही सामोरे जाण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अंतर्गत गटातटांची मोट बांधण्याचे नव्या शहराध्यक्षांसमोर आव्हान आहे.

एक व्यक्ति, एक पद ?

पक्षाच्या राजस्थान येथील उदयपुर ठरावानुसार 'एक व्यक्ति, एक पद' असा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष असलेले रमेश बागवे यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. म्हणून शहराध्यक्ष व इंटकचे अध्यक्षपद असलेल्या डॉ. कदमांनी राजीनामा द्यावा, अशी कुजबूज कॉँग्रेसच्या अंतर्गत गटातच सुरू आहे.

पक्ष प्रवेशामुळे आशा पल्लवीत

शिर्डीमध्ये काँग्रेसच्या पार पडलेल्या शिबीरात भाजपचे नगरसेवक बाबु नायर यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे शहर काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news