

दीपेश सुराणा :
पिंपरी : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुले शिकली की मग त्यांना चांगली नोकरी मिळेल किंवा ते व्यवसायात यशस्वी होतील, अशी धारणा सध्या समाजमनात बळकट होऊ लागली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्यावर पालक भर देऊ लागले आहे. मग त्यासाठी भरमसाठ शुल्क भरण्याचीही ते तयारी ठेवत आहेत.
पर्यायाने, इंग्रजी शाळांकडे कल वाढल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. तथापि, गेल्या वर्षभरात इंग्रजी माध्यमाच्याच पाच शाळा बंद पडल्या आहेत. मराठीची मात्र एकही शाळा बंद पडलेली नाही.
शहरात महापालिकेच्या 128, खासगी अनुदानित – 135, खासगी विना अनुदानित – 36, स्वयंम अर्थसहायित शाळा – 333, खासगी अंशतः अनुदानित – 22, समाजकल्याण अनुदानित -7, आदिवासी शाळा – 1, केंद्रीय विद्यालय – 1 आणि 8 अनधिकृत शाळा आहेत. या शाळांमधून 3 लाख 66 हजार 748 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड पाहण्यास मिळते.
त्यासाठी लागणारा वार्षिक खर्च पेलवणारा नसला तरीही गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबातील पालकही आपल्या मुलांना या शाळांमध्ये शिक्षण मिळावे, यासाठी आग्रही असतात. तथापि, इंग्रजी शाळांतील वातावरण आणि शैक्षणिक शुल्क न मानवल्याने दरवर्षी सरासरी पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पुन्हा प्रवेश घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी शाळांसाठी आवश्यक उपाययोजना
शाळांतील भौतिक सुविधा वाढवायला हव्या. शाळांकडून राबविण्यात येणार्या चांगल्या उपक्रमांबाबत माहिती द्यावी.
शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे.
पहिलीपासून असलेल्या सेमी इंग्रजी अभ्यासक्रमाबाबत पालकांना माहिती द्यावी. महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये होणार्या उपक्रमांबाबत करावे 'मार्केटिंग'. शिक्षकांनी उदासीनता कमी करुन विद्यार्थी व पालकांशी संवाद साधावा.
इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा कशामुळे?
इंग्रजी ही ज्ञानभाषा ठरत असल्याने तिच्या शिक्षणाला मिळतेय प्राधान्य.
इंग्रजी माध्यमात मुले शिकली की चांगली नोकरी मिळते, असा गैरसमज
मराठी शाळांमध्ये गरीब घरातील मुलेच शिकतात अशी वातावरण निर्मिती.
मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय घरातील मुलांना इंग्रजी शाळेतच टाकण्यावर भर.
महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही, संगणक, गणित विभाग, शास्त्र प्रयोगशाळा अशा विविध बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळा इंग्रजी शाळांच्या तुलनेत गुणवत्तेच्या पातळीवर पुढे राहाव्यात, यासाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहे.
-संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका.