आम्ही ‘मातोश्री’वर येऊ; पण प्रथम भाजपशी बोला : दीपक केसरकर | पुढारी

आम्ही ‘मातोश्री’वर येऊ; पण प्रथम भाजपशी बोला : दीपक केसरकर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावल्यास आम्ही नक्‍की जाऊ, असे विधान शिंदे समर्थक गटाचे प्रवक्‍ते आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी केले. मात्र, या चर्चेवेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना दूर ठेवावे. तसेच आता आम्हाला बोलावताना भाजपसोबतही चर्चा करावी लागेल, असेही केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावल्यास आम्ही नक्‍की जाऊ. मात्र, आम्ही आता भाजपसोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झाले आहे. आता परत जायचे असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपसोबतही चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल, असे केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आमचे सरकार म्हणजे लव्ह मँरेज केलेल्या जोडप्यासारखे आहे. आता या जोडप्याला पुन्हा घरी यायचे असेल तर दोघांच्या घरातील प्रमुखांना आधी एकमेकांशी चर्चा करावी लागेल, असेही केसरकर यांनी सांगितले.

शिवसेनेत ज्यांच्यामुळे फूट पडली, त्यांना तुम्ही भलेही पक्षातून काढू नका. पण त्यांना थोडे तरी बाजूला ठेवा, असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिला. आम्ही आमची कामे घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो की, हे लोक म्हणायचे काय काम आहे ते आम्हाला सांगा, आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगू.

मुख्यमंत्री हे आमचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या हातात अर्ज दिल्यानंतर आम्हालाही योग्य व्यक्‍तीच्या हातात अर्ज सोपवल्याचे समाधान मिळते. कोणीतरी एजंट मध्ये येऊन आमच्याकडे द्या, असे सांगत असेल तर त्याला तो अधिकार नाही, तो फक्‍त मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असेही केसरकर म्हणाले.

काय ते एकदा ठरवा : संजय राऊत
केसरकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवसेनेतून बंड करण्याचे काय ते नेमके कारण एकदा ठरवा आणि त्यानंतरच बोला, आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर अन्याय होतो. त्यानंतर उद्घव ठाकरे आमदारांना भेटत नाहीत. हिंदुत्वाच्या कारणावरून आम्ही बाहेर पडतोय अशी वेगवेगळी कारणे हे आमदार देत आहेत. त्यामुळे काय ते नेमके सांगा, असे संजय राऊ त यांनी म्हटले आहे.

एकीकडे दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असताना जळगावमधील शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील आणि दुसरे बंडखोर चिमणराव पाटील यांच्यातील धुसफूस उघड झाली आहे. गुलाबराव पाटील यांनी आपले उमेदवार कसे पाडले, त्यांना कसा त्रास दिला याचा पाढा एका कार्यकर्त्याशी बोलताना वाचला. हे सर्व पाहता बंडखोर गटामध्ये आलबेल नाही असे एकंदर चित्र आहे.

हेही वाचा

Back to top button