पिंपरखेड परिसरात जोरदार पाऊस, पिके भुईसपाट

पिंपरखेड येथे जोरदार पावसाने भुईसपाट झालेले उसाचे पीक
पिंपरखेड येथे जोरदार पावसाने भुईसपाट झालेले उसाचे पीक

पिंपरखेड, पुढारी वृत्तसेवा: पिंपरखेड गावाला शनिवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले. शेतातील ऊसपिकाबरोबर कडवळ चारापिके भुईसपाट झाली. दमदार पावसाने शेतकर्‍यांंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील कडक तापमानाने भूगर्भातील पाणीपातळीत लक्षणीय घट झाली होती. गेले दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना शेतकरी करीत होते.

घोड नदीच्या बंधार्‍यातील पाणी संपत आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असताना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. तासभर पडलेल्या पावसाने अर्ध्या पिंपरखेड गावाला चांगलेच झोडपून काढले. पाऊस पडलेल्या परिसरातील सर्वच शेतात पाणी साचले.

पावसाबरोबर आलेल्या जोरदार वार्‍याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील कडवळ व उसाचे पीक भुईसपाट झाले. पिंपरखेडच्या इतर भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाने बळिराजा सुखावला असून, या पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होणार आहे. खरिपातील मशागत, पेरणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news