

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा; कवठे येमाई (ता. शिरूर) गावठाण परिसरात 10 जून रोजी विजांचा कडकडाट व जोरदार वादळी वार्यासह झालेल्या पावसाने गावठाणातील जनावरांच्या दवाखान्यासमोरील सुमारे 150 वर्षांपूर्वीचे वडाचे मोठे झाड उन्मळून पडले. यात दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी मात्र टळली. एका घरावरील पाण्याची टाकीही जोरदार वार्याने कोसळली.
ढाकी, मुखेकरवस्ती परिसरात पावसाचा जोर अधिक होता; मात्र गावाचा पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत राहिला. काही भागात पावसाची हजेरीदेखील लागली नाही. ढाकी वस्ती परिसरातील ओढ्यांना पूर आला. ओढ्यानजीक असलेल्या विहिरीत पाण्यासाठी आडवे बोअर घेण्याचे काम सुरू होते. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वादळी पावसास सुरुवात झाली.
सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने जवळील ओढ्यास पूर आला व पुराचे पाणी थेट विहिरीत शिरले व आडवे बोअरचे साहित्य मशिनसह पाण्यात बुडाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पहिलाच पाऊस जोराचा झाल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडे पाहून त्यांच्या आडोश्याला उभे राहणे शक्यतो टाळावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम जाधव, सोसायटी संचालक भाऊसाहेब घोडे यांनी केले आहे.
हेही वाचा