पिंपरी : पावसाने ओढ दिल्यास पाणीबाणी! पवना धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा

पिंपरी : पावसाने ओढ दिल्यास पाणीबाणी! पवना धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्‍या मावळ तालुक्यातील पवना धरणाचा साठा केवळ 19 टक्क्यांवर आला आहे. हा साठा केवळ महिन्याभर पुरेल इतकाच आहे. दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत असून, पावसाने आणखी ओढ दिल्यास पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून महिना संपत आला तरी, अद्याप पवना धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही.

नदी, ओढे व नाले अद्याप कोरडे आहेत. तर, धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. धरणात शुक्रवारपर्यंत (दि.24) 19 टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षी या जून महिन्यात पावसाळा सुरू होऊन नदी व ओढे भरून वाहण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे धरणातील शिल्लक साठ्यात पाण्याची भर पडण्यास सुरूवात झाली होती.

धरणातून मावळ तालुक्यासह एमआयडीसी व पिंपरी-चिंचवड शहराला पाणी दिले जाते. पवना नदीतून पालिका दररोज 510 ते 520 एमएलडी पाणी उचलते. पावसाने आणखी ओढ दिल्यास शहरावर पाणी संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शहरात दिवसाआड पाणीपुरवठा आणखी काही महिने कायम राहील, असे चित्र आहे.
तर, दुसरीकडे दररोज पाणी द्या, या मागणीसाठी राजकीय पक्ष व संघटना जोरदार मागणी करीत आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रास 100 एमएलडी पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत दररोज पाणी देता येणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाई 

टप्प्याटप्प्याने काम न करता शटडाऊन घेऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात काम केले जात असल्याने त्यात अधिक वेळ जातो. अधिक वेळ पाणी उपसा व शुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रिया होत नाही. टाक्या भरत नाहीत. परिणामी, शहराला पाणीटचांईस सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यात महिना दोन महिन्यांत केल्या जाणार्‍या या दुरुस्ती कामामुळे नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. र्

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news