

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने तिघांची 16 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे महापालिकेत शिपाई म्हणून काम करणार्याने त्याच्या इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन ही फसवणूक केली आहे.
नोकरी लागल्याचे खरे वाटावे म्हणून त्यांनी तरुणांना पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांच्या नावाचे बनावट नियुक्तिपत्रदेखील दिले. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आशिष उबाळे, संदीप उदमले आणि यवशोब देवकुळे या तिघांना अटक केली आहे. याबाबत ओम विनायक मेमाने (वय 24, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर 2020 ते 4 जानेवारी 2022 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात, तर आरोपी उबाळे हादेखील महापालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. उबाळे याने मेमाने यांना, 'किती दिवस असे कंत्राटी काम करतो, मी तुला पर्मनंट नोकरी महापालिकेत लावतो,' असे सांगितले.
फिर्यादीला देखील त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटला. त्यामुळे मेमाने आणि त्यांचे मित्र शरद शिंदे व मयूर पवार अशा तिघांनी उबाळे आणि त्याच्या साथीदारांना वेळोवेळी 16 लाख 10 हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना नोकरी लागल्याचे खरे वाटावे म्हणून महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांच्या नावे बनावट नियुक्तिपत्रे दिली. दरम्यान, नोकरीच्या बहाण्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेमाने यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींनी आतापर्यंत तिघांची महापालिकेतील नोकरीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मात्र, इतर तरुणांची देखील त्याने अशाप्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पोलिस वर्तवत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर सावळे करीत आहेत.
हेही वाचा