पालखी सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त; चार हजार पोलिसांचा फौजफाटा असणार तैनात

पालखी सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त; चार हजार पोलिसांचा फौजफाटा असणार तैनात
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक यांच्यासह तब्बल चार हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे वारी होऊ शकली नाही.

त्यामुळे यंदा वारी सोहळ्यात रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट तयारी केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक स्वतः बंदोबस्ताच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहेत.

पालखी मार्गावर आखण्यात आलेल्या बंदोबस्ताची जबाबदारी ठिकठिकाणी निर्धारित केलेल्या अधिकार्‍यांवर देण्यात आली आहे. सहाशे होमगार्ड, एसआरपीएफची तुकडी, बीडीडीएस पथके आणि स्थानिक पोलिस असे चार हजार अधिकारी, कर्मचारी शहरात तैनात असणार आहेत. गुन्हे शाखेवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

तर वाहतूक उपायुक्त हे वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहणार असून, वाहतूक शाखेचा स्वतंत्र बंदोबस्त आखण्यात आला आहे. 20 जून रोजी देहू येथून संत तुकाराम महाराज व 21 जून रोजी आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन्ही पालख्यांचे 22 तारखेला पुण्यात आगमन होणार असून 22 व 23 जून रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत.

नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते, तर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी थांबणार आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून वाहतुकीचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते.

22 तारखेला इंजिनिअरिंग कॉलेज चौक येथे दोन्ही पालख्या एकत्र येत असल्याने येथे मोठी गर्दी होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. यानंतर येथून दोन्ही पालख्या नियोजनानुसार भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर व नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहेत.

या ठिकाणीदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दोन्ही पालख्या 24 तारखेला सकाळी सहा वाजता हडपसरकडे प्रस्थान करणार असून संत तुकाराम महाराज पालखी लोणी काळभोर- सोलापूर रोडने व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवड रोडने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

असा असेल पालखी बंदोबस्त

वारकर्‍यांसाठी हेल्पलाईन, ठिकठिकाणी मदतीसाठी बूथ
वॉच टॉवर उभारून त्याद्वारे खडा पहारा
गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेडिंग
पालखी मार्गावर आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा
साध्या वेशातील पोलिसांची गस्त
वाहतूक शाखेचा स्वतंत्र बंदोबस्त
अन्न औषध प्रशासनाकडून वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांची तपासणी
पालखी सोहळा मार्गावर मौल्यवान वस्तू व सुरक्षिततेच्या सूचना देणारे फलक
मार्गालगतच्या गल्लीबोळात पोलिसांचे मोटारसायकलवर पेट्रोलिंग
वैद्यकीय सुविधेबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था

साध्या वेशातील पोलिसांची गस्त

शहरात पालखी सोहळ्यानिमित्त मोठी गर्दी होते. पालखीच्या दर्शनासाठी अनेकदा चेंगराचेंगरी होते. या गर्दीचा गैरफायदा घेत चेन स्नॅचिंग अथवा इतर गैरप्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिलांचादेखील पालखी सोहळ्यात मोठा सहभाग असतो. त्यामुळे साध्या वेशातील महिला पोलिस कर्मचारी, त्याचबरोबर दामिनी मार्शलची पथके गस्तीवर ठेवण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस साध्या वेशात गस्त घालणार आहेत.

पालखी सोहळ्यासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त राहणार असून शहर परिसरात विविध पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. चेन स्नॅचिंग, पाकीटमारीच्या घटना रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पालखी कालावधीत वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

                                – संदीप कर्णिक, सहपोलिस आयुक्त, पुणे शहर.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news