पुणे : पुढारी वृत्तसेवा
मराठीतील वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होऊन तब्बल सव्वा वर्ष लोटले, तरी अजून या स्मारकाचे काम पाया घालण्यापर्यंतच रेंगाळले आहे. एकीकडे बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास तीन वर्षांत पूर्ण करण्याची वल्गना करणार्या महापालिकेने गदिमा स्मारकाच्या पायासाठीच वर्षापेक्षा अधिक काळ घेतल्याने स्मारक पुरे होण्यास किती वर्षे जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खूप प्रयत्नांनंतर कोथरूड येथील महात्मा फुले सोसायटीतील नियोजित जागेवर गदिमांचे स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन 22 मार्च 2021 रोजी झाले होते. पण, सव्वा वर्षात केवळ पाया व लोखंडी खांब उभारण्याचे काम झाले. स्मारकाच्या कामाला गती कधी मिळणार, असा प्रश्न गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी प्रशासनाला विचारला आहे.
ते म्हणाले, 'मराठी साहित्यात गदिमांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या स्मारकासाठी आम्हाला मोठा लढा द्यावा लागला. परंतु, आताही आमचा लढा संपलेला नाही. मी दहा दिवसांपूर्वीच स्मारकाच्या जागी भेट दिली. नुसता पाया तयार करून लोखंडी खांब उभारले आहेत. त्यापलीकडे स्मारकासाठीचे काम प्रगतिपथावर नाही. याबाबत मी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क केला होता.
त्या वेळी त्यांनी पाया रचण्यासाठी 3 कोटी खर्च झाला असून, खर्च स्मारकासाठीच केल्याचे मला सांगितले. स्मारकाच्या आराखड्यानुसार पुढे स्मारकाची इमारत असून, मागे एक्झिबिशन सेंटरची इमारत असणार आहे. त्यामुळे आताचे जे काम झाले आहे, ते स्मारकाच्या इमारतीचे की एक्झिबिशन सेंटरचे, याबाबत महापालिकेने खुलासा करावा. माझा असा समज झाला आहे की, स्मारकाच्या इमारतीचे काम अजून झालेले नाही आणि त्यासाठी 3 कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे.'
महापालिकेच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात कोथरूड येथे एक्झिबिशन सेंटरची उभारणी करणे आणि त्याअंतर्गत गदिमांचे स्मारक, प्रायोगिक रंगभूमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम प्राधान्याने गदिमा स्मारकासाठी खर्ची करावी आणि स्मारकाचे मागे पडलेले काम या वर्षी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या गदिमांच्या स्मारकाबद्दल अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. भूमिपूजन झाल्यानंतर जवळपास आतापर्यंत अडीच कोटींची कामे झाली आहेत. याही वर्षी महापालिकेने अर्थसंकल्पात 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीला वित्तीय समितीची मान्यता देऊन प्रशासनाने ताबडतोब काम सुरू करावे. येथे एकच इमारत उभारली जाणार आहे.
त्यातच एक्झिबिशन सेंटर, गदिमांचे स्मारक, प्रायोगिक रंगभूमीचे 300 आसनक्षमता असलेले छोटे नाट्यगृह असणार आहे. त्यामुळे याबाबतीत गोंधळ निर्माण करू नये. हे काम खूप मोठे आहे. त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याचा पाया रचला गेला असून, प्लींथ आणि फुटिंग झाले आहे. त्यामुळे स्मारकाचे काम रखडले आहे, असे म्हणू नये. काम चालू आहे, त्याला वेळ लागणारच. आम्ही यासाठी खूप पाठपुरावा केला. आता प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांनी काम पुढे न्यावे.
– मुरलीधर मोहोळ, माजी महापौर
हेही वाचा