सोलापूर : विमानसेवेसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेणार | पुढारी

सोलापूर : विमानसेवेसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सोलापुरात नागरी विमानसेवा सुरु करण्यासाठी आपण केंद्राकडे अनेकदा पाठपुरावा केला असे सांगत भाजपचे खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी हा प्रश्न तडीस नेण्यासाठी जूनअखेर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ दिल्लीदरबारी नेऊ, असे अभिवचन शुक्रवारी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गत आठ वर्षांत देशात व सोलापुरात झालेल्या विकासकामांची जंत्रीच खा. खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसेच आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांनी सादर केली. यावेळी पत्रकारांनी विमानसेवा, समांतर जलवाहिनीसह अनेक प्रश्नांकडे भाजपच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा मुद्दा मांडला. यावर खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी विमानसेवेचा प्रश्न आपण लोकसभेत उपस्थित केला तसेच या प्रश्नी केंद्रीयमंत्री पुरी व सिंधिया यांची भेट घेतल्याचेही सांगत आपण याकामी कुठेही कमी पडलो नाही, असा दावा केला. नुकतेच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ‘डीजीसीए’ कडे या प्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ नेणार, असेही ते म्हणाले.

यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी केंद्राची प्रधानमंत्री आवास, शेतकरी सन्मान, जनधन, मुद्रा, जीवनज्योती विमा, स्टार्टअप, पीक योजना यासह झालेल्या, प्रगतीपथावरील व प्रस्तावित महामार्ग विस्तारीकरणाच्या योजनांचा आकडेवारीनिशी तपशील मांडला. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते.

उजनीच्या पाण्याबद्दल तक्रार करणार

उजनी धरणाचे पाणी पळविण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातला असून याबाबत तसेच विमानसेवेबाबत आपण उद्या (दि. 4) सोलापूर दौर्‍यावर असलेल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी आ. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

Back to top button