चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव झोकात साजरा

चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव झोकात साजरा

भोसरीत विद्यार्थ्यांचे औंक्षण

भोसरी : परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक, विद्यार्थी, पालक उत्साही व आनंदी होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कार्टून उभे करण्यात आली. कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण, तर कुठे गुलाबपुष्प देऊन तर कुठे चॉकलेट्स देऊन स्वागत करण्यात आले. अनेक शाळांनी पहिल्या दिवशी पुस्तकांचेही वाटप केले. त्यामुळे शाळा परिसरात उत्सवाचे वातावरण होते. महापालिकेच्या शाळांमधून वंचित विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी परिसरातून फेरी काढण्यात आली.

पिंपळे गुरव येथे प्रभात फेरी
पिंपळे गुरव : सांगवी, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.पिंपळे गुरव येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सकाळपासून वर्ग शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता लगबग दिसून आली. पिंपळे गुरव येथील महापालिका शाळा आवारात विद्यार्थ्याच्या स्वागतसाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच, वर्गात फुले, फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

दापोडीत चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
दापोडी : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने दापोडी गावातून ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, वही व पेन इत्यादी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी दापोडी परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहीद अशफाक उल्लाह खाँ उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे माजी नगरसेवक संजय कणसे व रवींद्र बाईत यांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
बर्‍याच दिवसांनी आपले मित्र भेटल्यामुळे मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news