घोडगंगा कारखाना उपाध्यक्ष रंगनाथ थोरात अपघातात जखमी

घोडगंगा कारखाना उपाध्यक्ष रंगनाथ थोरात अपघातात जखमी
Published on
Updated on

शिरूर : पुढारी वृत्तसेवा: पुणे-नगर महामार्गावर बोर्‍हाडेमळा येथे झालेल्या अपघातात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात हे जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. रंगनाथ थोरात हे कारखान्याच्या कामानिमित्त कारखान्याच्या इनोव्हा कारने (एमएच 12 केजी 7699) पुण्याला गेले होते. त्या गाडीवर अप्पा मेंगवडे हे चालक होते. तेथून परतत असताना त्यांचे वाहन बोर्‍हाडेमळ्यातील चौकात आले असताना एक मोटार अचानक रस्त्यात आली.

त्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात मेंगवडे यांचा मोटारीवरील ताबा सुटला व ती विरुद्ध दिशेला येऊन पुण्याकडे जाणार्‍या स्कॉर्पिओ (एमएच 23 एमपी 90) जीपवर आदळली. यात अ‍ॅड. रंगनाथ थोरात व चालक मेंगवडे यांच्यासह स्कॉर्पिओतील नऊ जण जखमी झाले.
ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही वाहनांचे पुढील भाग चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यातच पलटी झाल्याने पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती कळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात अ‍ॅड. रंगनाथ भागुजी थोरात (वय 61, रा. आमदाबाद, ता. शिरूर) यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालक अप्पा मेंगवडे (वय 30, रा. माठ, ता. श्रीगोंदा, जि. नगर) व दुसर्‍या वाहनातील गणेश शिवदास पोकळे (वय 40), स्वाती गणेश पोकळे (वय 32), ओमराज रमेश पोकळे (वय 12), शरद सर्जेराव पोकळे (वय 30), अंजू शिवदास पोकळे (वय 70), राघोबा अर्जुन मेघवंडे (वय 42), विमल जनार्दन भावटनकर (वय 47), दिव्या प्रदीप सुरवसे (वय 45), सारिका रमेश पोकळे (वय 38, सर्व रा. बीड) हे जखमी झाले. यातील अ‍ॅड. थोरात यांच्यासह काही जखमींवर शिरूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news