कौशल्य अभ्यासक्रम कमी शुल्कात उपलब्ध; 15 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागणार

कौशल्य अभ्यासक्रम कमी शुल्कात उपलब्ध; 15 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये राबविण्यात येणार्‍या अल्पमुदतीच्या प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या 15 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. हे अभ्यासक्रम राबविणार्‍या संबंधित शैक्षणिक विभागाकडून प्रवेशपरीक्षा होणार आहे. यातील अनेक अभ्यासक्रम हे दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक पात्रतेवर आहेत. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात पूर्णवेळ अभ्यासक्रमांसोबतच अल्पमुदतीचे प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

हे अभ्यासक्रम अल्पमुदतीचे असल्याने, विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसोबतच शिकता येतात. त्याचप्रमाणे रोजगाराच्या दृष्टीने या अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याला प्रतिसाद असतो. या प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. विद्यार्थी विलंब शुल्क भरून 17 जुलैपर्यंत अर्ज भरू शकतात. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि दाखले अपलोड करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. कागदपत्रे अपलोड केलेल्या आणि शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपरीक्षा होणार आहे.

या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या कादगपत्रांच्या आधारेच, त्यांचा प्रवेश होणार आहे. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्यास, प्रवेशपरीक्षा होणार नाही. या अभ्यासक्रमांची प्रवेशपरीक्षा ही विभागाकडून घेण्यात येणार असल्याने, परीक्षेच्या तारखा विभागाकडून जाहीर करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेच्या कोणत्याही माहितीसाठी विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://campus.unipune.ac.in/ या लिंकवर संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news