परळी: विठ्ठलभक्तीने दुमदुमला घाट। जाहली सोपी वाट । पंढरीची॥ | पुढारी

परळी: विठ्ठलभक्तीने दुमदुमला घाट। जाहली सोपी वाट । पंढरीची॥

प्रा.रवींद्र जोशी
परळी: टाळ-मृदंगाचा झंकारअंभगाचा नाद अन् ऊन-सावलीची साथसंगत अशा अत्यंत भारलेल्या वातावरणात संत गजानन महाराज पालखी सोहळ्याने परळी अंबाजोगाई मार्गादरम्यान कनेरवाडीच्या पुढे असलेल्या घाटाचा टप्पा शनिवारी सकाळी पार केला अन् या भक्तिप्रवाहास सोबत घेत पालखी अंबानगरीकडे मार्गस्थ झाली.

संत गजानन महाराज पालखीचा दोन दिवस परळीत मुक्काम होता. परळीकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला हा सोहळा आज अंबाजोगाईच्या दिशेने मार्गस्थ झाला. जड अंतःकरणानेच परळीकरांनी पालखीला निरोप दिला. परळी, कनेरवाडी येथे पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. पालखी सोहळा टाळ-मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात कनेवाडी ओलांडून घाटाच्या दिशेने निघाला.

घाट पाहताच वारकर्‍यांच्या अंगात बळ संचारले. हा घाट जणू पालखीच्या स्वागतासाठीच उभा ठाकलेला. घाटावरचे प्रसन्न वातावरण पाहून वारकर्‍यांची मने अधिकच प्रफुल्लित झाली.वैष्णवांच्या मेळ्याने घाटात प्रवेश केला. विठुनामाचा गजर सर्वत्र टिपेला पोहोचला. पालखीसोबत वारकरीही धावू लागले. टाळ-मृदंगाचा, अभंगाचा निनाद डोंगरकपार्‍यात घुमला. अवघा घाट विठुनामाच्या गजरात दुमदुमून गेला. भाविकांनी हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी घाटात मोठी गर्दी केली होती.

डोळ्याचे पारणे फेडणारे मनमोहक दृश्य….

बालाघाटाच्या हिरव्यागार रांगा आणि त्यावर भगवी पताका हवेत फडफडताना,डोलताना पाहताना मन अतिशय प्रफुल्लित होत होते. शनिवारी (दि.25) सकाळी परळीतून कन्हेरवाडी, अंबलवाडी घाटातून पुढे प्रस्थान झालेली ही पालखी रात्री झालेला पाऊस आणि सकाळी असलेला आल्हाददायक गारवा, वातावरण मन प्रसन्न करणारे टाळांचे किणकिण आवाज, गण गण गणात बोते, माऊली, माऊली राम कृष्ण हरीचा जयघोष आणि त्यावर चालणारी पावले…. सर्वांत समोर तीन अश्व, त्यापाठोपाठ भगव्या पताका घेतलेले सेवेकरी, त्यामागे टाळकरी त्यामागे श्रीची पालखी व पादुका पुढेमागे, मृदंग, विणेकरी, डोक्यावर तुळशीचा कुंडा, भगवी पताका , अतिशय नयनरम्य दृष्य घाटातील वळणावर बघायला मिळाले.

Back to top button